संगीतकार 'अविनाश-विश्वजीत' यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती



संगीत क्षेत्राच्या नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमकत आहेत. नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत.. २०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या या जोडीनं अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही कायम जमिनीवर राहून संगीताची सेवा करण्याचं ब्रीद जपत अविनाश-विश्वजीत यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत.

'कधी तू रिमझिम झरणारी...', 'ओल्या सांज वेळी...', ‘ह्रदयात वाजे समथिंग...’ ही गाजलेली रोमँटिक गाणी आठवली की आपोआपच संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची आठवण होते. रोमँटिक गाणी म्हणजे अविनाश-विश्वजीत हे समीकरण जणू तयार झालं, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन्ही  चित्रपटांच्या गाण्यांतून लोकसंगीताचा रांगडा बाज दाखवत वेगळी झलक रसिकांना दाखवून दिली आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन सुपरहिट मराठी चित्रपटांतील 'धर्मवीर'मधील 'असा हा धर्मवीर...' या टायटल साँगसह 'सरसेनापती हंबीरराव'मधील 'हंबीर तू, खंबीर तू...' हे गाणं रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या दोन चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी झालेल्या अविनाश-विश्वजीत यांचे लवकरच आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

अविनाश-विश्वजीत म्हणजे अर्थातच अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी ही मराठमोळ्या संगीतकारांची जोडी... या जोडीतील विश्वजीत यांच्याकडे संगीतासोबतच गीतलेखनाचीही कला आहे. २००४ पासून विश्वजीत आणि अविनाश यांनी एकत्रितपणे आपली कारकिर्द सुरू केली. सुरुवातीला पार्श्वसंगीत आणि नंतर संगीत दिग्दर्शक असा नावलौकीक मिळवणारी ही संगीत दिग्दर्शकांची जोडी आज रसिकांची आवडती बनली आहे. रेडिओ मिर्ची म्युझिक अॅवार्ड, मटा सन्मान, सांस्कृतिक कलादार्पण पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर अशा वेगवेगळया पुरस्कार महोत्सवांमध्ये त्यांनी कायम बाजी मारत आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटाद्वारे अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं. या चित्रपटातील सर्वच गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत. त्यापूर्वी 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'ऑक्सिजन', 'आईचा गोंधळ', या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. संगीत दिग्दर्शनाकडे वळताना पदार्पणातच 'मुंबई-पुणे-मुंबई'सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिल्यानंतर या जोडगोळीनं मागं वळून न पाहता एक पेक्षा एक सरस चित्रपटांना संगीत दिलं. 'धागेदोरे', 'बदाम राणी गुलाम चोर', 'संभा', 'प्रेमाची गोष्ट', 'पोपट', 'सांगतो ऐका…!', 'आंधळी कोशिंबीर', 'कॅपुचीनो', 'गुरुपौर्णिमा', 'क्लासमेट्स', 'इश्क वाला लव्ह', 'मुंबई-पुणे-मुंबई २', 'रोशन व्हिला', 'ती सध्या काय करते', 'कंडिशन्स अँप्लाय' या चित्रपटांनी अविनाश-विश्वजीत यांची कारकिर्द बहरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...