२६ नोव्हेंबर रोजी डॉ. कांता नलावडे लिखित 'भरारी'या काव्य संग्रहाचे प्रकाशन.
जिज्ञासू, संवेदनशील राजकारणी, अभ्यासू वक्त्या, लेखिका कवयित्री असं दुर्मिळ अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. कांता नलावडे. त्यांच्या 'भरारी' या काव्य संग्रहाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार तसेचजेष्ठ रंगकर्मी, राष्ट्रीय नाट्य विद्यापीठाचे मा. संचालक पद्मश्री वामन केंद्रे आणि प्रख्यात लेखक, कवी, समीक्षक, पटकथाकार डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. ग्रंथाली प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित होणाऱ्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास राजकीय, कला - साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
साताऱ्यातील आराळे गावातील शेतकरी कुटुंबातील उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ. कांता नलावडे ह्या सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या आहेत. त्यांनी मा. नरेंद्र मोदी महामंत्री असताना मंत्रीपद भूषविले असून भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक वर्ष हिरिरीने कार्य केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 'महाराष्ट्र विधान परिषदे'च्या त्या सदस्या होत्या. त्यांनी पती जयसिंगराव नलावडे यांच्यासह 'जनसंघात' पक्ष कार्यकर्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि २००० मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव झाल्या. देशातील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती येथील बालेकिल्ल्यात २००९ मध्ये त्यांनी लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवून खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबत अटीतटीची लढत दिली. भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय, जिज्ञासू प्रवक्त्या म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे.
डॉ. कांता नलावडे आपल्या प्रदीर्घ स्वानुभवातून 'भरारी' या काव्य संग्रहाद्वारे रसिकांना नवी ऊर्जा बहाल करण्यासाठी उत्सुक असून दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे.
Comments
Post a Comment