"मधुरव - बोरू ते ब्लॉग' श्रीमंत मराठीचा अपूर्व खजिना ३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला.
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना "मधुरव"चे ऑनलाइन पद्धतीने प्रयोग केले. त्या उपक्रमाला रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. आता 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला असून येत्या ३ डिसेंबरला या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे संपन्न होणार आहे.
मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे "मधुरव - बोरू ते ब्लॉग" हा कार्यक्रम.
तथाकथित लेखक नसलेले पण लिखाणातून व्यक्त होणारे तुमच्यातले (प्रेक्षकांमधले) काही निवडक लेखक त्यांना रंगमंचावर बोलवून त्यांच्या लिखाणाचे सादरीकरण करणे. त्यांच्याशी तसेच प्रेक्षागृहातल्या प्रेक्षकांशी संवाद ,प्रश्नमंजुषा- भेटवस्तू असा परस्पर संवादाचा गंमतशीर प्रवाही असा हा कार्यक्रम. दोन तास हसत-खेळत मनोरंजन आणि प्रबोधन, तसंच साहित्याच्या जवळ नेणारा नवनिर्मित, अभिनव आणि पूर्वी न अनुभवलेला, आणि अनेक उत्तम कलाकार आणि तंत्रंज्ञ यांनी रंगलेला नटलेला असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
"मधुरव - बोरू ते ब्लॉग' ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर पार पाडणार आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, वेशभूषा श्वेता बापट, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
“मधुरव” हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या काळात फेसबुक व युट्युबवर खूप गाजला. सकारात्मकता आणि करमणूक यांचा उत्तम मेळ घालून लोकांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यात आणि व्यक्त होण्याची उमेद देण्यास यशस्वी झालेला हा उपक्रम केल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून “कोविडयोद्धा” हा पुरस्कार मिळाला.जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळालेला हा कार्यक्रम आता प्रत्यक्ष घेऊन येत असल्याने रसिकप्रेक्षकांनादेखील
नक्कीच आवडेल अशी आशा आहे. नवोदित उमदे लेखकही आपले लिखाण madhuravshow@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकतात
Comments
Post a Comment