'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक पहिली झलक प्रदर्शित.
'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही रमेश मोरे यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. 'साथ सोबत'च्या टिझरची आपली काही वैशिष्ट्ये आहेत. नायकाच्या मुखातील केवळ एक संवाद उत्सुकता वाढवणारा आहे. 'साथ सोबत'च्या रूपात तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट पहायला मिळणार असल्याची चाहूल टिझर पाहिल्यावर लागते. यातील नयनरम्य निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. सुरेख कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स आणि मातब्बर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरणार असल्याचं टिझरवरूनच जाणवतं. या चित्रपटात गावाकडची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. भपकेबाजपणापासून दूर असलेली साधी भोळी लव्हस्टोरी हेच या चित्रपटाचं खरं सौंदर्यस्थळ ठरणार आहे. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही चित्रपटात दडलेला आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला संग्राम समेळ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. त्यामुळे नव्या जोडीची अनोखी केमिस्ट्री 'साथ सोबत'मध्ये रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गेलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रमेश मोरेंच्या कल्पक दिग्दर्शनाचा स्पर्श या चित्रपटाला लाभला आहे.
'साथ सोबत' या चित्रपटात संग्राम-मृणाल या जोडीच्या साथीला राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफी हर्षल कंटक यांनी केली असून, अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे. यशश्री मोरे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना संगीतकार महेश नाईक यांनी स्वरबद्ध केल्या आहेत. महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. यशश्री मोरे यांनी वेशभूषा करण्याचीही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केली आहे. मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शनासोबत केशभूषाही केली असून, प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे 'साथ सोबत' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
Comments
Post a Comment