ओजस जोशी यांचं ‘शोधूया’ गाणं प्रकाशित......
गाण्यातून झळकणारा उत्साह ताल धरायला भाग पाडतो तसाच मनातील भाव-भावनांचा सूर ही गाण्यातच सापडतो. आशेचा असाच सूर घेऊन गायक डॉ. ओजस जोशी ‘शोधूया’ हे नवं गाणं घेऊन आले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून एक छानशी संगीत मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते हे गाणं नुकतेच प्रकाशित करण्यात आले. 'शोधूया शोधूया आनंदाच्या वाटा' असे बोल असणारं हे गाणं नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं असेल. या गाण्याचा अनोखा अंदाज आजच्या तरुणाईसाठी विशेष ठरेल, असा विश्वास गायक डॉ. ओजस जोशी व्यक्त करतात. ‘मनोरंजनाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम होणं गरजेचं आहे. ते काम डॉ. ओजस जोशी हा युवा गायक आपल्या गाण्यांतून सातत्याने करत आहे. आपल्याकडे अशा अनेक समस्या आहेत, ज्याविषयी उघडपणे बोललं जात नाही, असे विषय मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात, ओजस ते सातत्याने करतो आहे. ही नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तरुणाईला दिशा देण्याचा ओजसचा हा प्रयत्न स्तुत्य असून भविष्यात अजून चांगली गाणी तो करेल असा मला विश्वास असल्याचे सलील कुलकर्णी म्हणाले.
‘ओजस जोश’ या आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून ओजस यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी गाणी रसिकांसाठी आणली आहेत. आतापर्यंत तीन गाणी प्रदर्शित झाली असून 'शोधूया' हे चौथं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आगामी काळात अजून चार गाणी करण्याचा त्यांचा मानस आहे. मनोरंजनापलीकडे संगीताच्या माध्यमातून जनजागृती करणे या उद्देशाने मी ही गाणी केली असल्याचं डॉ. ओजस जोशी सांगतात. हल्लीच्या पिढीला आवडतील अशी मराठी गाणी इलेक्ट्रॉनिक्स म्युझिक आणि ट्रान्सच्या माध्यमातून सादर करत आम्ही माझ्या ‘ओजस जोश’ या प्रकल्पातून भविष्यात वेगवेगळे प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे गाणं शिवानी गोखले यांनी लिहिले असून अमेय गुंडाळे यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. गाण्याचे छायांकन, संकलन कवीरा स्पर्श यांचे आहे. गाण्यासाठी विशाल कब्रे यांचा ड्रोन वापरण्यात आला आहे.
Comments
Post a Comment