'श्यामची आई' चित्रपटाचं कृष्णधवल भित्तीपत्रिका प्रदर्शित.




साने गुरुजी या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या कादंबरीवर याच नावाने मराठी सिनेमा बनवण्यात आला आहे. एका गाजलेल्या लोकप्रिय कादंबरीवर आधारलेल्या या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 

अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुजय डहाके या प्रयोगशील तरुण दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या टायटलसोबत 'पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांच्या कादंबरीवर आधारीत' असं लिहून हा चित्रपट नेमका कशावर आधारलेला आहे याचा खुलासा करण्यात आला आहे. या चित्रपटात ओम भुतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली असून, यापूर्वी एका लक्षवेधी पोस्टरच्या माध्यमातून ओमचा साने गुरुजी लुक रिव्हील करण्यात आला आहे. त्यानंतर श्याम आणि त्याच्या आईची भूमिका कोण साकारणार? याचं कुतूहल सर्वांच्याच मनात जागं झालं होतं. या रहस्यावरूनही पडदा उठवण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'श्यामची आई' या चित्रपटाचं नवं कोरं कृष्णधवल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ दिसतो, तर श्यामच्या आईच्या रुपात गौरी देशपांडे समोर येते. या निमित्ताने गौरी आणि शर्व हे दोन चेहरे प्रकाशझोतात आले आहेत. 'श्यामची आई' ही कादंबरी साने गुरुजी यांनी १९३३मध्ये लिहिली असून, त्यात आईबद्दलचे प्रेम, भक्ती व कृतज्ञता व्यक्त केली आहे. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचं वर्णन 'मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र' असं केलं आहे. त्यांचाच वारसा जपत 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आईला देवता मानणारी भारतीय संस्कृती सर्वदूर पोहोचावी या उद्देशानं 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याची भावना निर्मात्या अमृता अरुण राव यांनी व्यक्त केली आहे.

या चित्रपटात मयूर मोरे, संदीप पाठक, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, दिशा काटकर, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर, ज्योती चांदेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी या चित्रपटासाठी संहितालेखन केलं आहे. छायांकन विजय मिश्रा यांनी केलं असून, बी. महातेश्वर यांनी संकलन केलं आहे. मेकअप महेश बराटे यांनी केला असून, वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. संगीत अशोक पत्कींनी दिलं असून, पार्श्वसंगीत साकेत-आभा यांचं आहे. आकीब सय्यद यांनी ध्वनी आरेखन, तर कुणाल लोणसुरे यांनी ध्वनीमुद्रण केलं आहे. कला दिग्दर्शन अमेय भालेराव यांनी केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.