'चौक' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस... लवकरच!
चौक... चौक म्हणलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही... अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया. आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली.
‘चौक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये, चौकात सूचना, सुविचार लिहिण्यासाठी असलेला फळा दिसतोय. दोस्ती ग्रुप, पुणे यांच्या या फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘चौक’ दिसतंय. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) प्रस्तुत ‘चौक’ चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट आहे, असा अंदाज बांधला जातोय. अद्याप या चित्रपटाच्या तारखेची घोषणा झालेली नसून हा चित्रपट नक्की कधी रिलीज होतोय, याची उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात कोण कलाकार असतील, चौक म्हणजे नक्की कशासंदर्भात कथा असेल, याचेही तर्क बांधले जात आहेत.
‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्की यश मिळवेल!
ReplyDelete