'अशीच आहे चित्ता जोशी' नाटकावर बंदी घालण्याची मागणी!
मैथ्थिली जावकर आणि 'संस्कार भारती' (कोकण प्रांत) यांच्या सहयोगाने, 'ओम साईनाथ प्रॉडक्शन्स' निर्मित, 'स्मित हरी' प्रकाशित २ अंकी सामाजिक धार्मिक विचारांच्या 'अशीच आहे चित्ता जोशी' या नाटकाचा पनवेल येथील प्रयोग पाहून मुंबईतील काही कष्टकरी महिलांच्या संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत शिवाजी मंदार नाट्यगृहातील प्रयोगादरम्यान निषेध मोर्चा काढून आपला आक्षेप नोंदविला आहे. या नाटकाचे येत्या शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्रौ ८:३० वाजता, प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली (प.), मुंबई आणि बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता, दीनानाथ नाट्यमंदिर, पार्ले येथे होणारे प्रयोग तात्काळ थांबवावेत आणि आम्हा सावित्रीच्या कष्टकरी लेकींची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा निर्वाणीचा संदेश निर्माती - अभिनेत्री मैथ्थिली जावकर यांच्यापर्यंत पोहचविला आहे. मैथ्थिली जावकर यांच्या तोंडी असलेल्या काही आक्षेपार्ह आणि तेढ निर्माण करणाऱ्या संवादांवर या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कष्टकरी सावित्रीच्या लेकींचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असे म्हटले आहे.
याविषयी आपली प्रतिक्रिया देताना लेखिका, अभिनेत्री, निर्माती मैथ्थिली जावकर यांनी सांगितले की आपल्या देशात सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच कलावंतांनाही आहे. आमच्या नाटकातील 'चित्ता जोशी' हे पात्र नव्या विचारांचे आहे. तिच्या विचारांना विशिष्ट अशी पार्श्वभूमी आहे. या भूमिकेचा सखोल विचार करूनच ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. नाटकातून मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर त्यातून कोणाच्या भावना दुखावत असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा नक्की प्रयत्न करू."
Comments
Post a Comment