दिगंबर नाईक यांना बाईने केले हैराण........
आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.*बाई वाड्यातून जा* असं ते म्हणतायेत. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी *‘बाई वाड्यातून जा’* हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल. येत्या बुधवारी २९ मार्चला अत्रे रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे.
या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा *‘बाई वाड्यातून जा’* या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
तब्बल चार वर्षांनी *‘बाई वाड्यातून जा’* या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.
तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचे आहे.नाटकाची जाहिरात संकल्पना संजय खापरे यांनी सांभाळली आहे. नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे. रंगमंच व्यवस्था सचिन सावंत तर व्यवस्थापन जयेश निकम ह्यांचे आहे.
Comments
Post a Comment