'जैतर'. . .खान्देशात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित एक संगीतमय प्रेमकहाणी.....
जैतर. . . चित्रपटाचे शीर्षक वाचून त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जसे ‘मित्र’ ह्या शब्दाला ग्रामीण बोलीभाषेत ‘मैतर’ असेही संबोधले जाते, अगदी त्याच्या विरुद्धार्थी ‘जैतर’ हा शब्द आहे. म्हणजेच हितचिंतक नसलेला तो ‘जैतर’. अर्थात, हा शब्द उत्तर महाराष्ट्रात खान्देश प्रांतातातील बोलीभाषेत प्रचलित आहे. ‘जैतर’ ही एका विद्यार्थीदशेतील प्रेमीयुगुलाची, मालेगावात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिकस्तर आदी गोष्टींवरून समाजात भेदाभेद होतो. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटतात आणि प्रेमीयुगुलाला संघर्षाला तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात ह्या संघर्षाचे गंभीर परिणाम अनेक अंगाने मुलीला भोगावे लागतात. प्रामुख्याने तिच्या शिक्षणावर आणि एकूणच स्वातंत्र्यावर बंदी येते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेतीव्यावसायिक आहेत. मालेगावात प्रेमप्रकरणावरून घडलेल्या ‘त्या’ सत्यघटनेत त्यांना याहून गंभीर समस्या दिसली आणि त्यांचे संवेदनशील मन व्यथीत झाले. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जैतर ही कथा लिहीली आणि त्याला समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सिनेमा हे माध्यम निवडले व ‘जैतर’ ह्या सिनेमाची निर्मिती झाली.
ह्या चित्रपटाचा संगीत व ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबईच्या फेमस स्टुडीयोत चार दशकाहून अधिक काळ मनोरंजन पत्रकारीतेत भरीव योगदान दिलेले ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. ह्या प्रसंगी सिनेमातील प्रमुख कलावंत रजत गवळी, सायली पाटील, गणेश सरकटे, गीतकार विष्णू थोरे, संगीतकार योगेश खंदारे आणि निर्माता मोहन घोंगडे व इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.
गीतकार मंगेश कांगणे, विष्णू थोरे आणि योगेश खंदारे यांच्या रचनांवर संगीतकार योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी हे ह्या चित्रपटाचे बलस्थान आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘देव मल्हारी’ हा गोंधळ ताल धरायला लावणारा तर अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘आधाराचं आभाळं’ हे विरहगीत काळजाचा ठाव घेणारे आहे. हर्षवर्धन वावरे-कस्तुरी वावरे ह्या गायक दांपत्याने गायलेलं ‘गुलाबी जहर’ प्रेमगीत मनाला रुंजी घालणारे तर संगीतकार योगेश खंदारे यांनी लिहिलेले तसेच गायलेले ‘होऊ दे कल्ला’ हे मस्तीगीत बहार आणणारे आहे.
चित्रपटाची पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन घन:श्याम पवार यांचे आहे. कागदावरचे दाहक वास्तव मनोरंजनाच्या माध्यमातून दृश्यरुपात आणण्यात दिग्दर्शकाने त्यांचे कसब पणाला लावले आहे. कथानकाची गरज ओळखून चित्रीकरण खान्देशात करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाला एक खानदेशी स्पर्श लाभला आहे. ह्या चित्रपटात रजत गवळी आणि सायली पाटील हे दोन नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असून गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे तसेच संग्राम साळवी सह इतर कलाकारांनी भूमिका वठविल्या आहेत.
प्रेमसंबंधातून घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित, शिवमल्हार पुजा फिल्म प्रोडक्शन निर्मित, निर्माता मोहन घोंगडे लिखित, घन:श्याम पवार दिग्दर्शित, धीरज वाघ यांच्या कॅमेरातून सजलेला आणि संगीतकार योगेश खंदारे यांच्या संगीतसाजाने नटलेला ‘जैतर’ हा चित्रपट येत्या १४ एप्रिल रोजी महाराष्ट्रभर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment