नागराज मंजुळे यांचा “सैराट” नंतरचा मराठी चित्रपट, सादर केली "खाशाबा"ची पहिली झलक !
काही दिवसांपूर्वी जिओ स्टूडियोजतर्फे त्यांच्या एकूण १०० चित्रपटांची मोठी घोषणा करण्यात आली. यात मराठीमधील अनेक दर्जेदार अश्या चित्रपट आणि वेब शोजची घोषणा करण्यात आली. यातील महत्वाची घोषणा म्हणजे नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणून फॅंड्री, सैराट नंतरचा तिसरा मराठी चित्रपट म्हणजे खाशाबा! भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारा मराठमोळा कुस्तीपटू म्हणजे 'खाशाबा दादासाहेब जाधव’ यांच्याच जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा नागराजने आज आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून "खाशाबा" चित्रपटाचे पोस्टर सादर करून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसेच खेळाडूंवर बनविण्यात आले आहेत आणि ते बॉक्स ऑफिस वर यशस्वी ही होताना दिसतायत. आता मराठीतील पहिला असा भव्यदिव्य स्केलचा एका खेळाडूवर आधारित असा चित्रपट जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे.
नागराज मंजुळे म्हणतात की," सिनेमा हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना या खऱ्या, अस्सल मातीतील पण जागतिक नाव कमवणाऱ्या खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा व्यक्तीमत्वाची ओळख हया चित्रपटाद्वारे जगाला व्हावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे."
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, आटपाट निर्मीत, नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" ह्या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी केली असून लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे.
Comments
Post a Comment