प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित
एक सॉलिड प्लॅन.. एक सरळ साधा मुलगा... आणि एक हनी ट्रॅप. संतोष कोल्हे दिग्दर्शित 'गेमाडपंथी'चे उत्सुकता वाढवणारे ट्रेलर प्रदर्शित झाले असून आता या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकणार, हे २ जूनपासून दर शुक्रवारी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर कळणार आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्सच्या यादीत आणखी एका वेबसीरिजचे नाव समाविष्ट झाले असून दि फिल्म क्लिक स्टुडिओजने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे. प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ट्रेलरमध्ये चिकूच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. आता हा चिकू कोण? आणि त्याला का किडनॅप करत आहेत. याशिवाय हनीच्या लिपस्टिक लावण्यामागचं नेमकं रहस्य? या सगळ्याचीच आता लवकरच उत्तरं मिळतील. या सगळ्या गोंधळात भल्याभल्यांची वाट लागणार असून एकापेक्षा एक मोठे गेमही होणार आहेत. यात कोण कोणावर भारी होणार, हे 'गेमाडपंथी' पाहिल्यावरच कळेल. बोल्डनेसने भरलेली ही वेबसीरिज कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमयही आहे.
दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणतात, ''टिझर पाहून अनेकांनी मला फोन, मेसेज केले. काय आहे नक्की 'गेमाडपंथी'? यातील विविध पात्रं एकमेकांचा गेम करत असतानाच स्वतःच एखाद्या गेमचे शिकार बनत आहेत. आता हे गेम कसे होत आहेत आणि 'गेमाडपंथी' नक्की काय आहे, हे प्रेक्षकांना वेबसीरिज पाहताना कळेलच. यात अनेक दर्जेदार कलाकार आहेत.'' तर 'गेमाडपंथी'बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख,संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही वेबसीरिज शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांना आवडेल अशी आहे. 'गेमाडपंथी' म्हणजे विनोद, रहस्य, प्रेम, थ्रिल असे संपूर्ण पॅकेज आहे. यातील सगळेच कलाकार उत्तम विनोदवीर आहेत आणि या कलाकारांपैकी अनेकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बोल्ड भूमिका साकारल्या आहेत.''
Comments
Post a Comment