राज्य नाट्यस्पर्धेत 'सफरचंद'ची बाजी.
मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ ही नाट्य कलाकृती सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेल्या या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ या नाटकाने प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे. आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या 'सफरचंद' या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.
‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रकाशित, 'सफरचंद' या नाटकात एक वेगळा विषय मांडला असून ‘सर्वधर्मसमभाव’ हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या 'सफरचंद' नाटकाने सगळ्याच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. फिरता रंगमंच, नेत्रसुखद नेपथ्य, वातावरणाला साजेसं मधुर संगीत, यातून जबरदस्त नाट्यानुभव प्रेक्षकांना मिळतो आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
Comments
Post a Comment