प्रेमाची 'अंब्रेला', येतेय तुमच्या भेटीला; बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच!



खरंतर प्रेमकथा ही काही मराठी प्रेक्षकांसाठी नवीन बाब राहिलेली नाही. गेल्या ५० दशकांत मराठी चित्रपटसृ्ष्टीत असंख्य प्रेमकथा पडद्यावर अवतरताना मराठी प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. आधी प्रेम, नंतर अॅक्शन आणि शेवटी दोघांचा सुखेनैव संसार अशा धाटणीचे अनेक सिनेमे मराठी चित्रपट रसिकांसाठी आता तोंडपाठच झाले असावेत! त्यामुळे आताशा प्रेक्षक नेहमीच नव्या धाटणीच्या चित्रपटाच्या किंवा थेट मनाचा ठाव घेणाऱ्या सादरीकरणाच्या शोधात असतात! प्रेक्षकांची हीच गरज पूर्ण करण्यासाठी येत्या ९ जून रोजी निर्माते मनोज विशे घेउन येतायत नव्या रंगांनी सजलेली प्रेमाची 'अंब्रेला'!

स्वत: मनोज विशेंनीच पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा नावाइतकाच दिलखेचक ट्रेलर नुकताच लाँच झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार यात शंकाच नाही! कारण चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून हाताळण्याची वेगळी शैली दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या ट्रेलरप्रमाणेच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलाय तो त्याच्या गाण्यांमुळे! अजय गोगावले, सुनिधी चौहान, केके. आनंद शिंदे, नकाश अजीज, भारती माधवी अशा एकाहून एक सुरेल आणि मनात रुंजी घालणारे आवाज या गाण्यांना लाभले आहेत.

आपल्या दमदार अभिनयाचा ठसा मराठी सिनेरसिकांच्या मनावर उमटवत घराघरांत पोहोचलेले अरुण नलावडे या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्या प्रेमाची भन्नाट केमिस्ट्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाय सुहिता थत्ते या प्रथितयश आणि घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीही त्यांच्या कारकिर्दीला साजेशा भूमिकेत दिसणार आहेत.

स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. नीलेश सतीश पाटील, सार्थक अधिकारी आणि आशिष ठाकरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी चित्रपटाचं संपादन केलं आहे. मुख्य सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी भूषण चौधरी यांनी सार्थपणे पेलली आहे. महेश गौतम, दलजीत सनोत्रा यांनी साऊंड इफेक्ट्सवर काम केलं आहे. राहुल आणि संजीव यांनी कोरिओग्राफी केली आहे. सुदेश देवान आणि तन्वीर मीर यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशाल पाटील चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. तर आय फोकस स्टुडिओनं पोस्ट प्रोडक्शन केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.