"बाईपण" ने नुसतं यश दिलं नाही तर एक ऊर्जा, बळ आणि आत्मविश्वास दिला - निर्मात्या माधुरी भोसले



     मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून घवघवीत यश मिळवत असलेल्या "बाईपण भारी देवा" या चित्रपटाने अवघ्या २० दिवसात ६२ कोटींची घसघशीत कमाई केली असून अजूनही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे, याच निमित्ताने खास बातचीत केली आहे ती या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्याशी.      
"बाईपण" ने नुसतं यश दिलं नाही तर एक ऊर्जा, बळ आणि आत्मविश्वास दिला - निर्मात्या माधुरी भोसले

 मराठी सिनेसृष्टी क्षेत्रात निर्माती म्हणून यायचे कसे ठरले आणि तुमची पार्श्वभूमी ?
पार्श्वभूमी बद्दल बोलायचं झालं तर , २०१८ पर्यंत मी रेडीओ मिरचीमध्ये रिजनल डायरेक्टर म्हणून काम पाहायचे . त्यावेळी माझ्या कामानिमित्त मी संपूर्ण भारतभर फिरले. आपण म्हणतो ना कि भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, तर याची प्रचीती मला त्या दरम्यान आली. संस्कृती, परंपरा, राहणीमान, भाषा अशा प्रत्येक घटकात प्रचंड विविधता होती आणि मुळात त्यात सौंदर्य होतं. तर ते मला फारच आकर्षक वाटलं. मग नंतर २०१९ मध्ये मी EMVEEBEE MEDIA हे स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. त्या अंतर्गत ब्रँडेड फिल्म्स, ऑडिओ टीव्ही त्यासोबतच हिंदी, मराठी आणि बंगालीमध्ये OTT कन्टेन्ट निर्मित केले. अशी बरीच कामे चालू होती. मराठी चित्रपसृष्टीत उतरायचंच होतं त्यासाठी मी चांगल्या स्क्रिप्ट्स बघत होते. काही चांगल्या स्क्रिप्टही आल्या होत्या. चांगले दिग्दर्शक होते आणि चर्चाही चालू होत्या. त्याच दरम्यान अजित भुरे, यांचा माझ्या सहकाऱ्याला फोन आला, की एक उत्तम स्क्रिप्ट आहे , भेटूया का? तर मी विचारलं, दिग्दर्शक कोण आहे? तर ते म्हणाले, केदार शिंदे. मी म्हटलं जरूर भेटूया. मग आम्ही भेटलो, केदारने स्क्रिप्ट वाचून दाखवली. ती स्क्रिप्ट मला आवडली तर होतीच आणि मनातूनही असं वाटत होतं कि ही फिल्म झालीच पाहिजेच आणि प्रेक्षकांसमोर आली पाहिजे. मला अगदी त्या क्षणापासून सकारात्मक भावना निर्माण झाल्या आणि लगेच कमला सुरुवात केली.  
 "बाईपण भारी देवा" चित्रपट तुमच्याकडे कसा आला आणि प्रवास
सप्टेंबर - ऑक्टोबर २०१९ च्या दरम्यान माझी OTT, हिंदी, ब्रँडेड फिल्म्स अशी कामे चालूच होती. तेव्हा असा विचार केला कि आपण मराठी चित्रपट करूया का? मी वेगवेगळ्या scripts बघत होते, काही लेखक, दिग्दर्शक यांना भेटत होते. चांगल्या स्क्रिप्ट ही आल्या. त्या दरम्यान मग अजित भुरे कडून बाईपण साठी फोन आला. मग मी केदारला भेटले. आधी या फिल्म चं नाव "मंगळागौर" होतं. या नावाबाबत मी तेवढीशी सकारात्मक नव्हते. मग आम्ही चर्चा वगैरे करून "मंगळागौर" ऐवजी "बाईपण भारी देवा" हे नाव ठरवलं. त्यावेळी केदारने जेव्हा बाईपण ची स्टोरी मला ऐकवली तेव्हा मला ती अगदी आपलीशी वाटली. मला वाटलं, अरे! ही तर तर आपल्या घरची गोष्ट आहे. म्हणजे, माझ्या घरात आम्ही पाच बायका आहोत. आमच्यातली भांडणे, गप्पा गोष्टी किंवा काही भावनिक क्षण असतील सगळंच अगदी संबंधित अस वाटत असल्याने मला ती स्वतःचीच गोष्ट वाटली. आणि खऱ्या अर्थाने हीच या फिल्मची जमेची बाजू आहे कि, ही गोष्ट सगळ्यांना आपलीच गोष्ट असल्यासारखी वाटते. नक्कीच फिल्म मध्ये ज्या घटना आहेत त्या आमच्या जीवनापेक्षा वेगळ्या आहेत. तरीही गोष्ट मात्र खूपच जवळची होती. त्यावेळी केदारने सांगितलं की त्या आधी ४-५ निर्मात्यांनी बाईपण ला नकार दिला होता. मला विशेष वाटलं की बाईपण सारख्या प्रॉजेक्ट ला कोण कसं नकार देऊ शकत. मी मात्र फारच खात्रीशीर होते कि बाईपण यशस्वी होणारच. आणि मी खात्रीशीर असण्यामागे बरीच कारणेही होती. गोष्ट तर होतीच, त्याबरोबर केदारची दूरदृष्टी, त्याची स्पष्टता, उत्कटता हेही होतं त्यामुळेच मी हा चित्रपट करायचं ठरवलं. इथून हा प्रवास सुरू झाला जो फारच रंजक होता. तेवढाच हसता खेळता, तेवढाच कठीण आणि तेवढाच शिकवणारा. सहा सात महिन्यांचा या प्रोजेक्टचा लाईन अप होता. पण खरंतरमध्ये जवळ जवळ साडे तीन वर्ष गेली. हा काळ वाढण्याची कारणेही तशीच होती. १ फेब्रुवारी २०२० ला फिल्म चं शूट सुरू झालं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. अडचण आली ती शेवटच्या सीनला. शेवटचा जो मंगळागौर स्पर्धेचा सीन होता त्याच शूट २१ मार्चला प्लॅन केल होत आणि १७ मार्चला लॉकडाऊन लागलं. कोविड पण वेगाने पसरत चालला होता म्हणून आम्ही मग त्यावेळी हे शूट पुढे करायचं ठरवलं. ज्यावेळेस परिस्थिती नीट होईल त्यावेळेस शूट करायचं ठरलं. त्यात दोन-तीन वाईट गोष्टी घडल्या अजितचे बाबा गेले ,माझे बाबा गेले. एकंदरीत वातावरणच असं होतं कि काहीच स्पष्टता येत नव्हती कि पुढे काय होईल.नंतर सप्टेंबरमध्ये शूट करायला थोडा स्कोप होता म्हणजे शूटला परवानगी होती पण लिमिटेड टीम आणि अजूनही काही बंधन होती.जसं की शूटिंगला ५० पेक्षा जास्त लोक नकोत वगैरे आणि या क्लायमॅक्सच्या सीनला जवळजवळ २00 कलाकार हवे होते. आता आमचा कर्मचारी वर्गच ३५ जणांचा होता. तर एक मोठे चॅलेंज होतं की हे कसं जुळवायचं. शूटिंग तर करायचं होतं आणि कॉम्प्रोमाइजही करायचं नव्हतं. मग केदारने खूप विचार करून एक सोल्युशन काढलं की आपण हा सीन फिल्म सिटी मध्ये इंडोर शूट करूयात. मग आम्ही त्यावर व्यवस्थित विचार केला आणि ठरवलं की या सहाही बायका ज्या स्पर्धा जिंकल्या आहेत त्यांचं जिंकणं एका कवितेने समराईज करूयात. त्यासाठी केदारने एवढी सुंदर कविता करून घेतली की ते पाहिल्यावर वाटलं अरे हाच तर चित्रपटाचा शेवट आहे. खूप सुंदर रित्या या कवितेने सर्व सारांश केलं. कुठेच कॉम्प्रमाईज नाही आणि हवं ते एक्झिक्युट झालं. त्यानंतर दुसरं लॉकडाऊन लागलं. त्यावेळीही आधीसारखच, अगदी कशाचीच क्लॅरिटी नव्हती. म्हणजे थिएटर्स सुरु होतील की नाही? आणि झाले तरी लोक येतील का ? कारण लॉकडाऊन मध्ये लोकांना ओटीटीवर फिल्म पाहायची सवय झाली होती आणि स्वतःची सुरक्षितता हा मुद्दा होताच.पण जसं की केदार बोलतो, स्वामींची कृपा आणि मीही विश्वास ठेवते की एक फोर्स असतो जो त्यांना नेहमी मदत करतो जे मेहनतीने आणि इमानदारीने काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. ३० जून २०२३ ला फिल्म रिलीज झाली आणि रिलीज नंतर ह्या बाईपण ने जो इतिहास घडवलाय, घडवतो आहे याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. एक ध्येय गाठण्यासाठीचा हा प्रवास मोठा होता, कठीण होता पण "बाईपण" ने जे यश दिलंय ते पाहून खूप समाधान वाटतंय.

 दिग्दर्शक केदार शिंदेंबद्दल काय सांगाल आणि त्यांचा आवडलेला गुण  
 केदारची "बाईपण भारी देवा" विषयी असलेली खात्री, त्याची तयारी. आवड आणि दूरदृष्टी हे मला अगदी पाहिल्यादिवसापासून दिसत होत. तो अगदी तयारीने यात उतरला होता, अगदी लहान लहान गोष्टी, त्यांची ट्रीटमेंट, ते स्टोरी ला कसे ड्राईव्ह करतील, सगळं सगळं अगदी केदारला क्लिअर दिसत होत. आणि जसं कि आपल्याला माहीतच आहे कि चित्रपट निर्मिती is all about team work. तर इथे केदारला असलेल्या विश्वासामुळे सगळे टीम मेंबर्सही एकाच पानावर होते वर होते, वैशाली असो, वासू असो किंवा सगळे कलाकार, म्हणजे Everyone was driven by single thought. कि काय करायचं, कसं करायचय. कसलंच टेन्शन नव्हतं. Captain of ship perfect असला की मोठ मोठ्या गोष्टी सहज घडून जातात.


 पहिल्याच निर्मितीत मिळालेले घवघवीत यश कसे वाटते आहे?
नक्कीच चांगलं वाटतंय. पण त्यापेक्षाही छान एका गोष्टीच वाटतंय ती म्हणजे, चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. चित्रपट पाहताना सगळे अगदी गुंतूनच जातात. नकळतपणे चेहऱ्यावर हसू येतं, नकळतपणे भावनिक होतात. एन्जॉय करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांनाही चित्रपट पाहण्यासाठी उत्स्फुर्तपणे आवाहन करतात. अगदी स्वतःची फिल्म असल्यासारखं बाईपणला उचलून धरलं जातंय प्रेक्षकांकडून. ही फिल्म केल्यानंतर मला काहीतरी मोठं केलंय यापेक्षा काहीतरी भारी केलंय असंच वाटतं नेहमी. बॉक्सऑफिस वरचे यश आहेच पण मला हेही तितकच महत्वाचं वाटतं कि ज्यांच्यासाठी ही फिल्म केलीय त्यांना ती अतिशय आवडतेय आणि ते भरभरून प्रेम देताहेत.

आगामी काळातील काही नवीन प्रोजेक्ट्स ?
"बाईपण" ने नुसतं यश दिलं नाही तर एक ऊर्जा, बळ आणि आत्मविश्वास दिला आणि खरंतर थोडं दडपणही दिलंय की आता जे काही करू ते अजून भारी असावं. त्या दृष्टीनेच पाऊल टाकत आहोत. नक्कीच काही प्रोजेक्ट्स वर काम सुरु आहेत, जे प्रेक्षकांना भावतील. प्राथमिक पातळीवर सध्या काम सुरु आहेत त्याविषयी सांगावासं खूप वाटतंय पण एवढ्या लवकर त्याविषयी बोलणं योग्य वाटणार नाही. पण एका गोष्टीची खात्री मी प्रेक्षकांना देऊ शकते ती म्हणजे जे काही येईल ते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ते तुमचं पुरेपूर मनोरंजन करेल.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.