निसर्गरम्य कोकणातील.......गम्य कथा..'उनाड'
गोष्ट तशी साधी सरळ सोपी, कोकणातील एका गावातील तीन महाविद्यालयात शिकणारे तरुण,तरुण वयात जशी मैत्री असते तशीच अंगात रग असणं,त्याच खोड्या, तारुण्य सुलभ शारारिक आकर्षण असणारी प्रेम प्रकरणं,मैत्रीत होणारे गैरसमज, मैत्रीला प्रेम समजणं, हेवेदावे, आसपासच्या गावातील मुलांमध्ये असलेलं साध्याशा कारणाने आलेलं वितुष्ट, काहीही न करता उनाडक्या करणं यातुन घरच्यांच्या शिव्या खाणं,घरच्यांना आपली मुलं चांगली शिकवीत मार्गी लागावित असं सहज वाटणं, त्यासाठी काही तजवीज कारण, त्यांच्यासाठी काम शोधणं, अशा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील घडणाऱ्या गोष्टी,पण अचानकपणे एखाद्या वेळी भावनेच्या भरात वाहुन जाऊन एखादा अशी कृती घडते की सर्वांचं आयुष्यच बदलून जातं.......
ही गोष्ट आहे तीन तरुणांची बंड्या,शुभम,...जमील. यांची, यांना मैत्रीण पण आहे,स्वरा, तारुण्य सुलभ असं सगळ्यांचच एक आयुष्य खूप मोठे चढउतार नाहीत की मोठ्या घटना,पण जोडणारा मैत्रीचा धागा मात्र घट्ट,त्यावयातील उद्योग करतात,पण काय करायचे याचा ठोस निर्णय विचार नाही, घरच्यांनी काही सांगावं तर ते करायला ह्यांचा विरोध, साहजिकच उनाड हा शिक्का घेतलेली ही मंडळी,स्वरा हि काही अंशी पुण्याची, पुणेरी मानसिकता घेऊन कब्बडी मध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सरसावलेली,शुभम चे वडील मच्छीमार ते सतत होडीवर खोल समुद्रात काही काही दिवस तिकडेच रहाणारे,शुभमची आई दगावतो तेव्हा सुद्धा ते वेळेवर हजर नसणारे, त्यामुळे शुभमच्या मनात कायम ह्या व्यवसाया बद्दल अढी, त्याला मच्छीमारी करण्यात काडीचा सुद्धा आनंद नाही,पण त्याच्या वडिलांना मात्र त्यानं हा व्यवसाय करावा असं वाटतं, बंड्या,त्याची आई लिलावात मासळी घेऊन मच्छी विक्रीचा व्यवसाय असते, जमीलचे वडील आखाती देशात नोकरी करतात, त्यामुळे जमीलने सुद्धा तिकडेच जाऊन नोकरी करावी असंच त्यांच्या कुटुंबीयांना वाटतं, खरं तर जमीलच्या आजोबांनी बेकरी उत्पादन यात व्यवसाय केलेला,पण जमीलच्या वडिलांना तो न झेपलेला, म्हणून ते आखाती देशांत नोकरीला गेलेले,यामुलांच काहीही न करता उंडारणं, चालू आहे,सोबत स्वरा हि मैत्रीण पण आहे,आणि त्यातच शुभम, स्वरा मधील जवळीक वाढते,शुभम साहजिकच काहीसा हुरळून जातो, आणि गैरसमजाचा बळी ठरतो, यातून तिच्या गावातील मुलगा पराग ह्याचा मधे वैर सुरू होतं, कालांतराने स्वरा आणि शुभम यांच्यात दुरावा निर्माण होतो,शुभम दुखावला जातो, अचानकपणे स्वरा आणि पराग यांच्यात काही प्रेम संबंध आहेत असं शुभमला वाटतं,प्रथमदर्शनी काहीसं तसचं दिसतं, यातुनच येणारी वैर भावनेच्या आहारी शुभम जातो, आणि एक गैर कृत्य करुन बसतो,पण यातुन मात्र भरडली जातात ती वेगळी माणसं,जमील, आणि स्वरांची बहिण,हे कृत्य खुपचं गंभीर वळण घेतं आणि होत्याच नव्हत व्हायची वेळ येऊन ठेपते,शुभम फरार होतो, पोलिस तपास, भरडला जाणारा जमील,स्वराची बहीण तिने केलेला आत्महत्येचा प्रयत्न यातुन कथापट एका निर्णायक वळणावर येऊन ठेपतो........
कथापटाचा जीव तसा छोटा आहे, त्यामुळे सुरूवातीला तो काहीसा संथगतीने काही प्रसंग,गमती जमती यातून पुढे सरकत जातो,पुर्वाधाच्या शेवटाकडे जाताना तो गतिमान होतो,मग त्याच्या घटितांचा वेग वाढतो आणि उत्तरार्ध निर्णायक शेवटाच्या दिशेने सरकतो,कथापटातील व्यक्तीरेखा ह्या कोकणातील मच्छीमार कोळी समाजातील आहेत,तर काही मुस्लिम समाजातील,पण त्याच्या बोलीभाषा मात्र सतत बदलत राहतात,कधी मालवणी,कधी पश्चिम महाराष्ट्रातील,तरी कधी कधी रत्नागिरीतील बोलीभाषा त्या त्या समाजातील,ही विसंगती सतत खटकत राहते,कथापट हा आल्या अर्थाने प्रादेशिक पार्श्वभूमीवर घडतो, तिथल्या हाडामासाच्या माणसांच्या गोष्टी सांगतो, त्यामुळे त्यासाठीची कोकणाची पार्श्वभूमी खर्याअर्थाने यथोचित असं दर्शन घडविते, तिथल्या समाजाचं जगणं,त्यांचे प्रश्न, गरजा, सुखदुःख,तिथली सर्वसाधारण मानसिकता यावर काही अशांनी घटना प्रसंग यातून समोर येते,एक सहजसुंदर सरळ सोप्प कथानक आपल्या समोर कथापट घेऊन येतो,. एखाद्या घटनेनं काही लोकांच आयुष्यचं बदलून जातं, अर्थातच आणि सुखाने नांदू लागले असंच......
कथापट त्याची सर्वांगसुंदर बाजू असेल तर निसर्ग श्रीमंत कोकण,तिथले समुद्र किनारे,खोल दुरवर पसरलेले पाणी,गावं,गर्द हिरवे पण,नौका मच्छीमारी,या सगळ्याचं केलेलं विलोभनीय असं चित्रीकरण, ड्रोनच्या साह्याने टिपलेली विहंगम दृश्य, कोकणातील पर्यटनच घडुन आणतात, समुद्रात खोलवर मच्छीमारी करणार्या होड्या, सभोवार पाणी,याचं चित्रिकरण सहजच कोकणसफरीला घेऊन जातं, त्यामुळे कथापटाची दृश्यश्रीमंती सहजच 'व्वा' म्हणून जाते, आत्ता पर्यंत अनेक चित्रपट कोकणात चित्रित झाले असतील,पण या कथापटात टिपलेलं कोकण निश्चितच वेगळं दिसतं, कोकणातील आडे,हर्णे, हर्णे बंदर,पाजपंढरी,आंजर्लै,दाभोळ, दाभोळजेट्टी, ही तिथली चित्रीकरण झालेली गांव सुंदर दिसतात.
आदित्य सरपोतदार याने कथापटाचं विषय त्याचा आशय,अतिशय त्यातील प्रसंग हे संयतपणे चित्रित केले आहेत.कथापटाचं संगीत त्या त्या प्रसंगात योग्य वेळी योग्य लयीत येतं,आणि ते तसं दृश्यमय सुद्धा होताना दिसतं, यातील अभिनय हा सहजसुंदर आणि लोभस असाच, बोलीभाषा वगळता.... आशुतोष गायकवाड (शुभम),याने आपल्या वाट्याला आलेली व्यक्तीरेखा छान निभावली आहे,सोबत अभिषेक भारते (बंड्या),चिन्मय जाधव (जमील),हेमल इंगळे,(स्वरा), देविका दप्तरदार (बंड्याची आई) अविनाश खेडेकर (पराग), प्रियांका तेंडुलकर (स्वरांची बहिण)या सर्वच कलावंतांनी अतिशय छान अभिनय केलेला आहे,त्याच गावातील कलाकारांची सोबत हि उत्तम लाभली आहे,
कथापट छान भावनिक,सहज साधीशी,भावणारी गोष्ट सांगतो,यातील कोकणातील निसर्ग पाहून आपणही दृश्य पाहून काही काहीकाळ उनाडुन येतो, त्यामुळेच रम्य निसर्गतील गम्य गोष्ट पहायला मिळते.
**************************************************************************************************
जिओ स्टुडिओ प्रस्तुत,
निर्मिती: ज्योती देशपांडे, अजित अरोरा,चंद्रेश भानूशाली,प्रइतएश ठक्कर,
दिग्दर्शक:आदित्य सरपोतदार,
कथा/पटकथा: आदित्य सरपोतदार,सौरभ भावे,
गीते:गुरु ठाकूर, क्षितीज पटवर्धन.
संगीत: गुरुराज सिंह.
छायांकन: लॉरेन्स डाकुन्हा.
संकलन:फैजल,इम्रान,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समीक्षण: वैभव बागकर.
Comments
Post a Comment