जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल!
जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या 'को म की का' या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या 'जा रे जा, सारे जा' पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ - मराठी माध्यम शाळेच्या 'छोटा अंबानी' या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या 'अ-फेअर'ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.
लालबाग, परळ या कामगार विभागातील डिलाईल रोड 'रविकिरण मंडळ हे 'दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक केंद्र' म्हणून ओळखले जाते. ते खेळाडू आणि कलावंतांचे आशेचे किरण असून गेली सहा दशके हे मंडळ अविरत कार्यरत आहे. लहान मुलांची शालेय जीवनापासून नाट्यकलेची आवड जोपासली जावी व त्यासोबतच त्यांची प्रशंसा व्हावी या उद्देशाने गेली ३६ वर्षे ही संस्था बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत आहे. नुकतीच मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिर येथे दिवंगत जेष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना समर्पित करण्यात आलेली ३७ वी बालनाट्य स्पर्धा मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी खास 'आई कुठे काय करते?' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेता अभिषेक देशमुख, या मालिकेची लेखिका व कमलाकर नाडकर्णी यांची कन्या नमिता नाडकर्णी - वर्तक, केईएमच्या डॉ. नीना सावंत(मानोसोपचार तज्ञ), यांसह परीक्षक अभिनेत्री दीप्ती भागवत, जुई लागू - खोपकर व अरुण मडकईकर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुलांशी दिलखुलास संवाद साधला. मुलांना यशाचा मंत्र सांगताना ते म्हणाले, "रूप, रंग यापेक्षा अभिनय महत्वाचा आहे. तो जमला तरच तुम्ही नायक - नायिका होऊ शकता, मलाही लहानपणी अभिनयात न्यूनगंड होता, मात्र जेष्ठ दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी आज यशस्वी अभिनेता झालो आहे. रविकिरण सारख्या संस्थेचा मला लाभ घेता आला नाही, पण आज तुमच्या सोबत ही संधी आहे, तुम्ही तिचा पुरेपूर लाभ घ्यावा."
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश नामदेव वांद्रे मंडळाचे चिटणीस यांनी केले. ते म्हणाले जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली असून नाडकर्णींचे रविकिरण मंडळासोबतचे दृढ आणि अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. बालरंगभूमीशी नाडकर्णींनीची नाळ जोडलेली होती, ते स्वतः बालकलाकार, लेखक, नाटककार असल्याने त्यांना बालकलाकारांच्या भावविश्वाची अचूक जाण होती, बालरंगभूमीबद्दल त्यांना कायम ममत्व होते.
मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय टाकळे त्यांच्या भाषणात म्हणाले, "रविकिरणचं हे ३७ वे वर्षे आहे. नाट्यकला सेवेतून संस्थेने अनेक प्रतिभावंत कलावंतांच्या जडणघडणीत विशेष भुमिका पार पाडली आहे. ३७ वर्षांच्या या संपूर्ण प्रवासात सुखद आठवणींसह दुःखद प्रसंग देखील आले, मात्र तरीही न डगमगता हा प्रवास असाच सुरू आहे व राहील.
या बालनाट्य स्पर्धेला एलआयसी, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी आर्थिक भार उचलून सहाय्य केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अशोक परब यांनी सांभाळली व पारितोषिक वितरण समारंभाला लागणाऱ्या क्रिएटिव्ह कामाची जबाबदारी विनीत देसाई, मंदार साटम, व रोशन वांद्रे यांनी सांभाळली.
Comments
Post a Comment