जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण 'अमलताश' चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित



जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या 'अमलताश' या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे. 

हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसतेय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे 'त्या' कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ८ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणतात, '' चित्रपटाचे वेबसीरिज मध्ये रूपांतर होते. मात्र इथे उलट झाले आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपटरूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झाले. आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणे, हा चित्रपटामागचा विचार होता. आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केले आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील. आमचे चित्रीकरण हे पुण्यात झाले आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळले तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल.''

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.