प्रदर्शनापूर्वीच परदेशात 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे शोज विक्रमी वेळेत 'हाऊसफुल्ल'



सुधीर फडके संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व आजही वादातीत आहे. परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या हा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. त्यात ट्रेलर पाहून ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच भारताबाहेर २४ तासांत या चित्रपटाचे दोन शोज 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. त्यामुळे 'बाबुजीं'वरील प्रेक्षकांचे प्रेम यातून दिसत आहे. 

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' भारताबाहेरून असा प्रतिसाद मिळावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.  यावरून 'बाबुजी' हे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरताच किंवा देशापुरताच मर्यादित नसून ते परदेशातही तितकेच सर्वश्रुत आहे. मला खात्री आहे, महाराष्ट्रातही 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.''  

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...