"अप्सरा" चित्रपटातुन गीतकार मंगेश कांगणे यांच संगीतकार म्हणून पदार्पण.



सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी "अप्सरा" या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. लेखक, दिग्दर्शक  प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 
 
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश कांगणे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीनं अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. त्या शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब्दरचना, व्यक्तिरेखेची नेमकी अभिव्यक्ती, कथानकाची नेमकी गरज ओळखून गीतलेखनामध्ये मंगेश कांगणे माहीर आहेत. आता गीतलेखनाच्या पुढे जात मंगेश यांना सुरांचीही संगत लाभली आहे. 

२०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील" टिकटिक वाजते डोक्यात" या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक या क्षेत्रात काम करुन जवळपास  १२५हुन अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. अनेक दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खुप नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. यातूनच आपणही संगीतकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकावे   या गोष्टींसाठी मी उत्सुक होतो आणि "अप्सरा" च्या निमित्ताने मला ही संधी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

"अप्सरा" चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप,  भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे  विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.     

अप्सरा चित्रपटात एक अनोखी प्रेम कथा अतिशय रंजकपणे मांडण्यात आली असून अप्सरा कोण असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजवर गीतकार म्हणून हिट गाणी नावावर केलेल्या मंगेश कांगणे यांच्या नावावर संगीतकार म्हणून ही हिट गाणी जोडली जातील यात शंका नाही


Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.