धनंजय भावलेकर दिग्दर्शित 'कर्मवीरायण' उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..


'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट,
महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.
ट्रान्सएफेक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. या चित्रपट पटकथा लेखनासाठी स्व.भाई वैद्य, स्व.नागनाथ कोतापल्ले, स्व.रामनाथ चव्हाण, स्व.राम ताकवले, डॉ. अभिजीत वैद्य, ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे अश्या मान्यवरांनी मार्गदर्शन आणि एक्स्पर्ट टीम म्हणून काम केले आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण, संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

बालपणातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज त्यानंतर युवा अवस्थेत महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हा मंत्र मनी बाळगून विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव ‘कर्मवीर’ झाले. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता १९ जुलै पासून चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.


Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.