‘फुलवंती’ चित्रपटातील ‘भो शंभो' गाणं प्रदर्शित.

नृत्यदेवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाने प्रथम नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. नृत्यमग्न अवस्थेतल्या श्री शिवशंकरांना नटेश, नटेश्वर व नर्तेश्वर असेही म्हटले जाते.  गायन, वादन, नर्तन अशा त्रिसूत्रीतून निनादणारं ‘फुलवंती’ चित्रपटातील ‘भो शंभो' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
भारतीय अभिजात संगीत आणि शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्य यांचा अद्भुत संगम आपल्याला यात पहायला मिळणार आहे. शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत असे वेगवेगळे रस दाखविताना नृत्य आणि पखवाजाचा रंजक सामना या गाण्यातून आपल्याला पहायला मिळणार आहे. अप्रतिम अभिनय व नृत्याविष्कार असणार्‍या या चित्रपटाने नृत्य व मानवी भावना यांचा अनोखा संगम दाखवला आहे.
शुद्ध स्फटिक संकाशम, त्रिनेत्रम पंच वत्रकम् !
गंगाधरम् दशभुजम, सर्वाभरण भूषितम !
नीलग्रीव शशांकांकम् , नाग यज्ञोपवितीनम !
व्याघ्र चर्मोत्तरीयंच,  वरेण्यं अभयप्रदम ।।
स्मरुनी अंतःकरणी तुजला, ठेविला देह चरणी तुझिया !
मजसी सामर्थ्य द्यावे हे नटराजा !
सर्वस्वाचे हवन मांडले मज मति द्यावी जगदीशा..!
 
भो शंभो शिव शंभो स्वयंभो!
भो शंभो शिव शंभो स्वयंभो!
 असे बोल असलेलं हे गाणं विश्वजीत जोशी यांची लेखणी व पारंपरिक रचनेतून अवतरलं आहे. राहुल  देशपांडे आणि बेला शेंडे यांनी हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. संगीतसाज अविनाश विश्वजीत यांचा आहे.
    सध्या मराठी रुपेरी पडद्यावर ‘फुलवंती’ चित्रपट आणि त्यातील गाण्यांची जोरदार चर्चा आहे. ‘फुलवंती’ चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असताना 'भो शंभो' हे नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'भो शंभो' हे गाणे सध्या प्रदर्शित करण्यात आले असून इतर गाण्यांप्रमाणे हे गाणं देखील रसिकांना भावेल.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत... ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती  रसिकांच्या भेटीला आली असून या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचेअसून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन,मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.