हास्य-विनोदाचा कल्ला करत आला 'श्री गणेशा'चा टिझर.
मराठी चित्रपटसृष्टीत कायम विविध विषयांवर चित्रपट बनतात. या तुलनेत रोड मूव्हींची संख्या फार कमी आहे. त्यामुळेच अशा धाटणीचा एखादा चित्रपट आला की प्रेक्षकांच्या नजरा लगेच त्याकडे वळतात. याच कारणामुळे 'श्री गणेशा' हा नातेसंबंधांतील धम्माल गंमती-जंमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी 'श्री गणेशा'च्या टिझरला लाईक करत त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. थोडक्यात काय तर हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
'श्री गणेशा' धमाल रोड ट्रीपचा आणि 'श्री गणेशा' फॅमिली एंटरटेनमेंटचा' असे म्हणत एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला 'श्री गणेशा' चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली असून, लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. सदानंद उर्फ टिकल्या आणि भाऊसाहेब पाटील यांच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'श्री गणेशा... होऊ दे रे होऊ दे...' असे गाणेही टिझरमध्ये कानावर पडते, जे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांना दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात सादर केले आहे. आजवर प्रथमेशने कायम लांब केसांच्या तरुणाची भूमिका साकारली आहे, पण यात त्याचे केस खूप छोटे करण्यात आले आहेत. याउलट कायम वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणाऱ्या शशांक यांचा क्लीन शेव्ह लुक आहे. यात प्रथमेशसोबत मेघा शिंदेची जोडी जमली आहे. या सर्वांच्या सोबतीला संजय नार्वेकर आपल्या अनोख्या शैलीत धमाल करणार आहेच.
'श्री गणेशा'ची सिनेमॅटोग्राफी डीओपी हजरत शेख वली यांनी केली आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतरचना केली असून, त्यावर संगीतकार वरुण लिखते यांनी सुमधूर संगीतसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले असून, संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दिपक एस कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून सहदिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केले आहे.
Teaser Link
https://www.instagram.com/reel/DCioi7RpUKl/?igsh=MTQwYnp0M3hibnhseQ==
https://youtu.be/Wb_czdczyFA?si=-u2VK4i_gJ7x4u7-
Comments
Post a Comment