‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा
धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'येक नंबर' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे.
ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून ८ नोव्हेंबर रोजी ‘येक नंबर’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजेश मापुस्कर या व्हिजनरी दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट व सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची ही निर्मिती असून ‘येक नंबर’मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड घातलेली आहे.
ही कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो गावातील एक उमदा आणि राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचे मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती आहे आणि त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. "तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.", अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप हे अशक्यकोटीतील आव्हान स्वीकारतो आणि अनपेक्षितपणे तो राज साहेबांशी संबंधित एका हत्येच्या कटात गोवला जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रतापला योग्य-अयोग्याच्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या प्रवासात धक्कादायक वळणांनी भरलेली एक थरारक कथा उलगडत जाते.
‘येक नंबर’ हे एक खिळवून ठेवणारे कथानक आहे आणि यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम व राजकारणाचे नाट्य गुंफलेले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हाने यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.
ZEE5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा म्हणाले, "आमच्या मराठी पोर्टफोलिओमध्ये '‘येक नंबर’' या चित्रपटाची भर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेम व राजकीय नाट्य यांची या चित्रपटात उत्तम प्रकारे सांगड घातली आहे. 'धर्मवीर २' या चित्रपटानंतर आमच्या मराठी कंटेन्टमध्ये ही उत्तम कलाकृती समाविष्ट झाली आहे. यातून, विविध प्रकारची कथानके सादर करण्याप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते. स्थानिक कथांमध्ये असलेल्या ताकदीवर आमचा विश्वास आहे आणि ‘येक नंबर’ हा चित्रपट या व्हिजनशी पूर्णपणे सुसंगत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि प्रेक्षकांना उत्तम कथानकांच्या माध्यमातून खिळवून ठेवणारा कंटेन्ट सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
‘येक नंबर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले, "‘येक नंबर’ हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. ‘येक नंबर’च्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल."
‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित म्हणाल्या, "आम्हाला ही प्रभावी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE5 सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. ‘येक नंबर’मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे आणि इतके गुणवान कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पुढील प्रवासाबाबत आशावादी आहोत आणि ZEE5 च्या माध्यमातून ही अप्रतिम कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत.
‘येक नंबर’ चित्रपटात प्रतापची व्यक्तिरेखा साकारणारे धैर्य घोलप म्हणाले, "प्रताप ही व्यक्तिरेखा साकरण्याचा अनुभव अतुलनीय होता आणि प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. प्रेम आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेला प्रतापचा प्रवास आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या अनेकांचा संघर्ष अधोरेखित करतो. चित्रपटाचे प्रभावी कथानक, आमच्या प्रतिभावान कलाकारांचा उत्तम अभिनय आणि दिग्दर्शकांचे व्हिजन यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी अनुभूती तयार झाली आहे. ZEE5वर चित्रपटाचा प्रीमियर होत असताना, आमच्या चाहत्यांसोबत या प्रवासात पुढे जाण्यास मी उत्सुक आहे.’’
Comments
Post a Comment