दादरच्या छबिलास शाळेत “नवनिर्मित विचार क्षमता निर्माण करणे” या विषयावर अभिनव उपक्रम,पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
ज. ए. इ. छबिलदास हायस्कूल, दादर व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “नवनिर्मित विचार क्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छबिलदास हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.
या सोहळ्याला पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून मुंबई विभागाचे शिक्षण संचालक श्री. राजेश कंकाळ तसेच जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“दादर परिसरातील सर्व विज्ञान शिक्षकांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी हातभार लावावा,” असे आवाहन ज. ए. इ. चे कार्याध्यक्ष श्री. शैलेंद्र साळवी यांनी आवाहन केले.
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचारांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण होते; विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे,” असे मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर पानसे यांनी प्रतिपादन केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ज. ए. इ. चे कार्यवाह श्री. विकास पाटील व मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. रुपेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. उद्घाटन सोहळ्यामुळे दादर परिसरातील विज्ञानप्रेमी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा