नव्याने रंगभूमीवर आलंय 'तरुण तुर्क म्हातारे अर्क'...
काही नाटके रंगभूमीवर स्वतःचा विशेष ठसा उमटवत असतात. यातच 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकाचे नाव घ्यावे लागेल. 'ह, हा, ही, ही'ची बाराखडी मांडणारे आणि नाट्यरसिकांना मनमुराद हसवणारे हे नाटक आता नव्याने रंगभूमीवर आले आहे.
प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये जल्लोषात पार पडला. प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर व विजया राणे या पाच महिलांनी मिळून या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण व नीता पेंडसे हे आजचे आघाडीचे कलावंत प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासह चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, निलेश देशपांडे, श्रुती पाटील हे कलाकारही या नाटकात विविध भूमिका रंगवत आहेत. प्रा. मधुकर तोरडमल यांनी या नाटकात गाजवलेली प्रोफेसर बारटक्के ही भूमिका नव्या संचात अतुल तोडणकर रंगवत आहे.
प्रा. मधुकर तोरडमल लिखित हे नाटक १९७२ यावर्षी प्रथम रंगभूमीवर आले होते. त्यात प्रा. मधुकर तोरडमल यांनी 'ह, हा, ही, ही'ची मांडलेली बाराखडी नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरली होती.आता अनामिका व कौटुंबिक कट्टा निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित हे नाटक नव्या संचात रंगभूमीवर आले आहे. राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. या नाटकाला तुषार देवल यांनी पार्श्वसंगीत दिले असून, प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. मंगल केंकरे यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अशोक मुळ्ये व दिनू पेडणेकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत असून रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा