'शाहू छत्रपती' चित्रपटाच्या शीर्षकाचे दिमाखदार अनावरण
निर्माते डॅा. विनय काटे यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चित्रपटाच्या निर्मीतीमागील आपले मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचे सांगत, डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राजर्षी शाहूंचा वैचारिक वारसा व इतिहास जतन करण्यासाठी हा चित्रपट खूप मोलाचा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी, असा भविष्यवेधी विचारही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंब्यामुळे 'शाहू छत्रपती' या चित्रपटाचा भव्य घाट घातल्याचे दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी याप्रसंगी सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला तोच सर्वोत्तमपणा या चित्रपटातून दिसेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी चित्रपटाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना नियतीनेच चित्रपटाचा हा योग घडवून आणल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांच्या गुणात्मक आयामांचा वेध आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहणार नाही तो चित्रपटातून तितकाच भव्य प्रभावीपणे मांडण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. महाराजांच्या वंशातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी चित्रपटाला शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.
राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर पाच भाषांमध्येही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या 'शाहू छत्रपती' चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे असणार आहे. विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment