'सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा.
मराठी कला क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा'ने गौरवण्यात येते. नुकताच हा दिमाखदार पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. या वेळी कला क्षेत्रात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यंदाचा 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार' जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात आला तर प्रभाकर सावंत (गोट्या सावंत) यांना 'कर्मयोगी पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला विजय कदम, मकरंद देशपांडे, विजय गोखले, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, अंकुश चौधरी, भार्गवी चिरमुले, मंगेश कदम, राजेश देशपांडे, संदीप पाठक, प्रसाद खांडेकर, आदर्श शिंदे, सौरभ गोखले, रुपाली भोसले, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे ,सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अनंत महादेवन, मंगेश बोरगावकर, विजय पाटकर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या शानदार सोहळ्याची सुरुवात गणेशवंदनाने झाली. सोहळ्यात स्वानंदी टिकेकर आणि सुयश टिळक यांच्या निवेदनाने रंगत आणली. तर कलाकारांच्या नृत्याने आणि विनोदी स्किटने या सोहळ्याला चारचाँद लागले. या वेळी नाटक विभागात, 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' मंगेश कदम ( आमने सामने) आणि वैभव मांगले (इबलीस) यांना विभागून देण्यात आले तर याच विभागातील 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार अभिनेत्री समिधा गुरू यांना देण्यात आला. चित्रपट विभागातील 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' अंकुश चौधरी आणि संदीप पाठक यांना विभागून देण्यात आला, तर उषा जाधव हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार देण्यात आला .नीरज शिरवाई यांना नाटक विभागात 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन' तर चित्रपट विभागात अनंत महादेवन यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन' हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात 'इबलीस' या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कार मिळून बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटकाचा मानही त्यांनीच पटकावला आहे तर चित्रपट विभागात 'माईघाट' या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले असून हा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' ठरला आहे आहे.
'कलागौरव पुरस्कार' मिळाल्यानंतर डॉ. विलास उजवणे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या, ''आज प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी इथे उभा आहे. शुद्ध आणि स्पष्ट बोलणाऱ्यांमध्ये माझं नाव घेतलं जायचं. परंतु आता या आजारपणामुळे माझ्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. या काळात मला माझ्या कुटुंबीयांनी भक्कम आधार दिला. आज या पुरस्काराने मला गौरवण्यात आलं आहे, याचा आनंद आहेच. परंतु हा पूर्णविराम नसून ही माझी आता सेकंड इंनिंग सुरु झाली आहे. मी लवकरच पुन्हा येईन. '' तर 'कलागौरव पुरस्कारा'ने गौरवल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री उभा नाडकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, '' आजवर मी जे काम केले त्यात निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकार या सगळ्यांचीच मला साथ लाभली. परंतु इथे मी पडद्यामागील कलाकारांचे विशेष आभार मानेन. माझ्या या प्रवासात त्यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे आहे. निर्माता, दिग्दर्शक यांच्यामुळे या भूमिका मिळतात, परंतु या भूमिका मिळायला नशीबही तितकेच बलवत्तर लागते. हा पुरस्कार मिळाला म्हणजे मी निवृत्त झाले असं नाही. मी अजिबात थकलेली नाही. या पुरस्काराने मला अधिक जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे.'' तर 'कर्मयोगी पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलेले गोट्या सावंत म्हणतात, ''हा माझा पहिलाच पुरस्कार आहे, त्यामुळे विशेष आनंद आहे. आशा व्यक्त करतो कदाचित ही पुरस्कार मिळण्याची सुरुवात असेल.''
Comments
Post a Comment