'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये.......
निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित 'बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक '७५व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'बनी'च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध 'सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध 'माद्रिद' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील 'फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आणि नुकतेच जाहीर झालेल्या ‘के आसिफ’, ‘अयोध्या’, ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सवासाठी 'बनी'ची निवड झाली असून आपल्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला मिळालेले भरघोस यश सर्व तंत्रज्ञ कलावंतांच्या अथक परिश्रमाचे द्योतक आहे, असे निर्माते शंकर धुरी यांनी म्हटले आहे.
विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतू त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे. अनेक चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय मांडण्यात आला आहे.दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने हुबेहूब दाखविण्याचे कसब डीओपी कार्तिक काटकर बिनीच्या कलावंताने लीलया पेलल आहे. निर्माता, लेखक-दिग्दर्शक आणि डीओपी या त्रिसूत्रीने बनी चित्रपट निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करताना आपलं नवखंपण कुठेही जाणवू दिलं नाही.
बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे. आकर्षक कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं असून सुस्पष्ट साउंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. बनीचं रहस्य गडद करणारं संकलन योगेश भट्ट याचं असून त्यावर उत्कंठा ताणणारं साजेसं पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे. स्थिरचित्रण निखील नागझरकर यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन विशाल पाटील, सुनील जाधव याचं आहे. वेशभूषाकार पल्लवी दळवी, केशभूषा प्रफुल्ल कांबळे, स्वाती थोरात, वॉर्डड्रॉप महादेव शिंदे आणि रंगभूषाकार ललित कुलकर्णी यांनी यातील व्यक्तिरेखांना सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. डीआय हितेंद्र परब तर प्रोमो डिझाईन पंकज सपकाळे यांनी केले आहेत. निर्मिती कार्यात कार्यकारी निर्माता दिगंबर बोईवार, लाईन प्रोडूसर विजय देवकर, निर्मिती सूत्रधार महादेव शिंदे, यासीन आली यांनी महत्वाचे कार्य केले आहे. चित्रपटाची प्रसिद्धी डिझाईन्स सचिन डागवाले, सोशल मीडिया मॅनॅजमेन्ट समीर भोसले, फेस्टिव्हल कॉर्डीनेशन मोहन दास यांचे आहे.
Comments
Post a Comment