'थ्रीडी'मध्ये अवतरणार 'संत ज्ञानेश्वर' महाराजां'ची महागाथा.



महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं महान संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रानं संतपरंपरेचा वारसा जपला आहे. वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या आध्यात्मिक वचनांनी परदेशीय नागरिकांच्या मनावरही गारुड केलं आहे. एकीकडे लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून संतांच्या शिकवणूकीची जपणूक करत आहेत, तर दुसरीकडे याच महान संतांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी नागरिक भारतात येऊन वास्तव्य करत आहेत. 'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।' या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी संतरूपी इमारतीचा पाया रचला. आईप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालणारे संत ज्ञानेश्वर आज माऊली म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. या माऊलींची गाथा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीनं लवकरच थ्रीडी रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

निर्माते अजय ठाकूर यांनी नुकतीच व्ही. पतके फिल्म्सच्या बॅनरखाली आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या निमित्तानं माऊलींचा जीवनप्रवास थ्रीडीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्याकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली आहे. हा मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश असलेला एक भव्य चित्रपट असेल. या चित्रपटाची कथा-पटकथा अजय ठाकूर आणि समीर आशा पाटील यांनीच लिहीली आहे. निर्माते अजय ठाकूर यांनी आजवर 'तानी', 'फुंतरू', 'टकाटक', 'डार्लिंग' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. समीर आशा पाटील यांनीही 'चौर्य', 'यंटम', 'वाघेऱ्या', 'डार्लिंग' अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. 

देवाजवळ मागण्याची वेळ आली तेव्हा स्वत:साठी काहीही न मागता उदार अंत:करणानं संपूर्ण विश्वासाठी 'पसायदान'रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले. 'आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्वर।।' या अभंगानुसार माऊलींच्या वास्तव्यानं आळंदीसारखं गाव पवित्र झालं. 'महाविष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर।।' या अभंगात माऊलींना महाविष्णूचा अवतार म्हटलं आहे. अशा माऊलींचं जीवनचरीत्र आजवर बऱ्याच निर्माता-दिग्दर्शकांनी आपापल्या परीनं प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असला तरी या चित्रपटात माऊलींचं काहीसं वेगळं रूप आणि देवासोबतचं अनोखं नातं पहायला मिळणार आहे. या चित्रपटात टायटल रोलमध्ये कोण दिसणार आणि त्यांच्या जोडीला कोणकोणते कलाकार दिसणार याबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर लवकरच मुहूर्त आणि पुढील कामे वेगात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रोडक्शन हाऊसच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.