*हुतात्मा क्रांतीवीर राजगुरू यांना सांगितीक मानवंदना*
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार,पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले महान क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या देशभक्तीच्या भावनेला मानवंदना देण्यासाठी ‘नमन हुतात्मा राजगुरू’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे.
पुण्यातील पुणे जिल्हा परिषद सभागृहात राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. गीतकार डॉ. संगीता बर्वे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत यांची सुंदर संगीतमय साथ लाभली असून स्वर लाभले आहेत मनीष राजगिरे आणि कार्तिकी गायकवाड यांचे. सदर गीताचे दिग्दर्शन, संकलन आणि संयोजन पूजा थिगळे यांनी केले आहे.
देशासाठी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी फासावर जाणारे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गीत निर्मीतीची संधी मिळाली यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया संगीतकार अविनाश विश्वजीत यांनी व्यक्त केली. या गीतातून नव्या पिढीला नवीन दिशा मिळेल आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सदर गीताची निर्मिती पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ श्री आयुष प्रसाद आणि राजगुरुनगर पंचायत समितीचे बीडीओ श्री. अजय जोशी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. बऱ्याच वर्षानंतर मराठीत एक चांगले देशभक्तीपर गीत आल्याचे समाधान यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment