'राष्ट्र'मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा



काही कलाकारांच्या केवळ उपस्थितीमुळे प्रेक्षकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आशयसंपन्न कथानकाला सकस अभिनयाची जोड देणारे कलाकार असलेला चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावतो. 'राष्ट्र' या आगामी मराठी चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळणार आहेत. दिग्गज कलाकारांच्या यादीत विक्रम गोखले यांचाही समावेश आहे. 'राष्ट्र' या चित्रपटात विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा 'राष्ट्र' २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखलेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या उपस्थितीमुळं 'राष्ट्र'ला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. गोखले यांनी आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते विक्रम गोखले 'राष्ट्र'मध्ये काहीशा अनोख्या रंगात दिसणार आहेत. यात त्यानं एक धडाकेबाज राजकारणी साकारला आहे. ज्याच्या केवळ शब्दावर संपूर्ण कारभार चालतो असा राजकीय नेता या चित्रपटात विक्रम गोखलेंनी रंगवला आहे. भगवे वस्त्र, कपाळाला टिळा आणि भारदस्त आवाजाच्या आधारे गोखलेंनी साकारलेला राजकारणी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आहे. 'राष्ट्र' हा चित्रपट वर्तमान काळातील राजकीय परिस्थितीवर कडक शब्दांत भाष्य करणारा आहे. यात आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामुळं समाजात उमटत असलेल्या पडसादांचं चित्र 'राष्ट्र'मध्ये पहायला मिळणार आहे. प्रथमच मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या इंदरपाल यांनी या चित्रपटाद्वारे आरक्षणाची नवी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव आदी कलाकार आहेत. याशिवाय मंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही 'राष्ट्र'च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहेत. मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या विक्रम गोखले यांनी 'राष्ट्र'मधील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत समाजातील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मदत केल्याची भावना दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केली आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.