‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा बोलबाला.....
मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २४ तासात या गाण्याने २ मिलियन्स व्हूयुजचा टप्पा पार करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मनाला भिडणारी शब्दरचना आणि संगीताचा सुमधुर ठेका याने सजलेल्या या गाण्याला बॉलीवूड संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे.
जय अत्रे यांनी लिहिलेलं ‘होऊन जाऊ दे’ हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल या युवा अभिनेत्यांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. दोन मित्रांची धमाल केमिस्ट्री या गाण्यातून पहायला मिळतेय. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा या चित्रपटातून पहाता येणार आहे.
या गाण्याच्या यशाबद्दल बोलताना संगीतकार मनन शाह सांगतात की, आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं एक ख़ास स्थान असतं. या गाण्यातून प्रत्येकजण आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देईल. हे गाणं प्रत्येकाला कनेक्ट होईल अशा रीतीने आम्ही ते तयार केलं. त्याला मिळालेलं यश त्याचीच पावती आहे.
‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट गाणी दिल्यानंतर आता मराठीच्या संगीत क्षेत्रातल्या पदार्पणातही त्यांच्या ‘होऊन जाऊ दे’ गाण्याने कमाल केली आहे. 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची धुराही मनन शाह यांनी स्वत: सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांचे आहे.
‘एस एंटरटेन्मेंट’ बॅनरखाली 'रूप नगर के चीते' १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment