आग्र्याच्या लालकिल्ल्यात डॉ. अमोल कोल्हेंची ‘गरुडझेप’
इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी आग्र्याच्या लालकिल्ल्यात मिळाली. निमित्त होते शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या प्रमोशनचे. प्रफुल्ल तावरे प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशन करिता गरुडझेपच्या टीमने माध्यम प्रतिनिधींसह आग्रा भेट केली.
या चित्रपटाच्या निमित्ताने हा थरार जिथे घडला त्या लालकिल्ल्यात अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी हा ऐतिहासिक अध्याय, त्याबद्दलची माहिती, शूटिंग दरम्यानचा अनुभव याबाबतची माहिती माध्यम प्रतिनिधींना यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे, त्यातूनच इतिहासाचे स्मरण आणि आयुष्याची लढाई लढण्याची प्रेरणा मिळू शकते. या भावनेतूनच आग्रा भेटीचा हा अनुभव देण्याची संकल्पना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि चित्रपटाच्या टीमने मांडली.
आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
अचूक नियोजन करणे, तपशीलवार माहिती गोळा करणे यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळत गेले. आग्र्याहून सुटका ही मोहीम याचेच उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला धैर्याने, संयमाने सामोरं जाण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण प्रत्येक मोहिमेत दिसतो. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातून हा थरार आणि महाराजांच्या या गुणांचा प्रत्यय घेता येणार आहे.
जगदंब क्रिएशन्स या निर्मीती संस्थेच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल कोल्हे यांची आहे.
येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment