प्रवीण तरडे म्हणतात… धर्मवीर सिनेमाने मला अक्षरश: घाम फोडला…....२५ सप्टेंबर धर्मवीर पहा झी टॉकीज वर !



शिवसेना नेते धर्मवीर आनंद दीघे यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारीत धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनी घेऊन आली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर सिनेमाचा टीव्ही प्रीमियर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.


धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अभिनेता, निर्माता मंगेश देसाई याच्या मनात घोळत असलेला एक विषय प्रत्यक्षात पडद्यावर येईपर्यंतचा धर्मवीरचा प्रवासही खूप रंजक आहे. हा सिनेमा पाहून, वा, मस्त झालाय सिनेमा, सगळे कॅरेक्टर एकदम छान आहेत, प्रसंग खूप छान गुंफलेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. पण दिग्दर्शक प्रवीण तरडे या सिनेमाच्या अनुभवाविषयी काय म्हणत आहेत माहित आहे का?  प्रवीण तरडे असं म्हणाले की, माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे.  आता प्रवीण तरडे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला या सिनेमाने का बरं घाम फोडला असावा हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तर त्याची कारणंही प्रवीण यांनी सांगितली आहेत. झी टॉकीज वर होणाऱ्या वर्ल्ड प्रीमियर च्या निमित्ताने या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा या सिनेमामेकिंगचा पट गप्पांमधून उलगडला आणि  अनेक गोष्टींना उजाळा दिला .
 
धर्मवीर या सिनेमाच्या स्क्रिप्ट टू स्क्रिन प्रवासातील काय आठवणी आहेत? 

या प्रश्नावरच हटके उत्तर देत प्रवीण यांनी त्यांच्या लेखी हा सिनेमा काय आहे हे दाखवून दिले. प्रवीण म्हणाले, अवघ्या पाच महिन्यात या सिनेमाचं काम पूर्ण झालं. सगळं इतकं फास्ट होत होतं की या सिनेमाच्या काही आठवणीच नाहीत. मागचं आठवून आणि साठवून ठेवेपर्यंत पुढचं शेड्यूल तयार असायचं. त्यामुळे सिनेमा बनत असताना कॅमेरामागचा निवांतपणा अनुभवताच आला नाही. पण ती घाई गडबड हवीहवीशी वाटत होती.
 
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा म्हणजे धर्मवीर  नेते आनंद दिघे यांचा जीवनपट आहे. त्यामुळे सिनेमातील आनंद दिघे यांच्या मुख्य व्यक्तीरेखेपासून त्यांच्या राजकीय प्रवासातील सहकाऱ्यांच्या व्यक्तीरेखांसाठी कास्टिंग निवड करणे हे फार मोठं आव्हान होतं. याच विषयावर प्रवीण तरडे यांना बोलतं केलं. प्रवीण सांगतात, सिनेमाचा निर्माता आणि माझा मित्र मंगेश देसाई याची फार इच्छा होती की त्याला आनंद दिघेंची भूमिका करायला मिळावी.  हट्ट नाही पण लुक टेस्ट घेण्याचा मंगेशने आग्रह धरला. पण तो काही आनंद दिघे लुकमध्ये फिट बसला नाही. भाडिपाच्या सारंग साठे याचं नाव पुढे आलं. त्याच्या फोटोवर काम केलं. सारंग दिघे साहेबांच्या जवळपास जात होता, पण त्याच्या काही नियोजित कामासाठी तो परदेशात असल्याने त्याचं नाव मागे पडलं. दरम्यान दिग्दर्शक विजू माने यांनी दिघे करावेत यासाठी त्यांची लुकटेस्ट घ्यायचं ठरलं. पण झालं असं की, विजू माने हे ठाणेकर आहेत. ते म्ह्णाले, मी जर आनंद दिघे पात्र केलं तर माझं ठाण्यातील वावरणं कठीण होईल. माझं स्वातंत्र्य कुठेतरी बंदिस्त होईल. विजू माने यांच्या नकारानंतर मात्र कास्टिंगचं टेन्शन यायला लागलं. तेव्हाच माझ्या एका मित्राने प्रसाद ओकच्या फोटोवर काही ग्राफिक करून आनंद दिघे लुक केला आणि ते फोटो मला पाठवले. प्रसाद दिघेसाहेबांच्या जवळपासच नव्हे तर हुबेहुब दिसत होता. त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले. प्रसादची ऑडिशन घेण्याचा प्रश्नच नव्हता हे त्याने सिनेमातील भूमिकेतून सिध्द करून दाखवले.
 
प्रवीण पुढे म्हणाले, सिनेमा कधी प्रदर्शित करायचा हे मंगेशने ठरवलं होतं त्यामुळे हातात फक्त पाच महिनेच होते. प्रसादचं कास्टिंग झाल्यावर मग एकनाथ शिंदे या पात्रासाठी क्षितिश दाते ही महत्वाची निवड करण्यात यश आलं. जेव्हा बायोपिक करत असतो तेव्हा अभिनय, देहबोली यावर कलाकार काम करू शकतात. आव्हान असतं ते मूळ व्यक्तीपर्यंत पोहोचणारा लुक. धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत आम्ही हे धनुष्य पेलू शकलो आणि त्याचा परिणाम म्हणूनच सिनेमाने कमावलेलं यश आहे याचा आनंद आहे. माझ्या आजवरच्या सिनेमात सर्वात लवकर पूर्ण झालेला हा सिनेमा आहे. दिग्दर्शक म्हणून प्रत्येक सीनचा काळजीपूर्वक विचार मी केला कारण दिघे साहेबांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या प्रत्येकाला ते आपले वाटले पाहिजेत. अरे, दिघेसाहेब असेच होते ही जेव्हा प्रतिक्रिया मला मिळाली तेव्हा या सिनेमासाठी घेतलेल्या प्रत्येक कष्टाचे सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात होती. येत्या २५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तेव्हा हा चित्रपट नक्की पहा !

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.