इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी.



गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिचर फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन होत आहे.

या निवडीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना या चित्रपटाचे निर्माते–अभिनेते चिन्मय मांडलेकर सांगतात की, ही निवड आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो आहे याचा आनंद नक्कीच आहे. पण यापलीकडे हा केवळ चित्रपटाला मिळालेला बहुमान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी ‘शिवराज अष्टक’ याचा जो यज्ञ दिग्पालने सुरु केला आहे त्याचा हा बहुमान आहे. ‘शिवराज अष्टक’ याच्या मध्यावर येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्पालच्या चित्रपटाची घेतली गेलेली दखल एक निर्माता, अभिनेता आणि दिग्पालचा मित्र या नात्याने मला मोलाची वाटत आहे.

इफ्फी निवडीचा आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, गेल्या ६ वर्षात कष्टाने केलेल्या  ‘शिवराज अष्टक’ मालिकेला अव्याहतपणे प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. इफ्फी सारख्या मानाच्या ठिकाणी ही निवड होणं आणि त्याचे स्क्रीनिंग ही आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी हा बहुमान उर्जा देणारा आहे. आम्ही योग्य मार्गाने जातोय याची ही पोचपावती आहे. शिवभक्तीने छत्रपती शिवरायांच्या चित्रपटाचे सादरीकरण करीत असताना, आम्ही उच्च निर्मितीमूल्यही योग्यरीतीने सांभाळत आहोत हे या निवडीतून अधोरेखित होतंय.

शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा महत्त्वाचा अध्याय ‘शेर शिवराज’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 'शेर शिवराज' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची असून लेखन –दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.