'रौंदळ' चित्रपटातील 'भलरी...' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.





'ख्वाडा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे 'रौंदळ' या आगामी मराठी-हिंदी चित्रपटामुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. 'बबन' या गाजलेल्या चित्रपटानंतर 'रौंदळ'मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पहायला मिळणार आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि 'मन बहरलं...' या गाण्यानंतर सर्वत्र सध्या 'रौंदळ'ची चर्चा सुरू आहे. त्यात भर टाकण्यासाठी या चित्रपटातील आणखी एक नवं कोरं गाणं दणक्यात आलंय.

सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार  म्हणजेच "भलरी ", हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. भलरीला आपल्या साहित्यात 'श्रमगीत' म्हणूनही विशेष दर्जा आहे . हा लोप पावत चाललेला गीतप्रकार 'रौंदळ' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी , कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गजानन नाना पडोळ या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय . 'रौंदळ'च्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावरच या चित्रपटातील आणखी एक सुमधूर गीत म्हणजे 'भलरी' रिलीज करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण बाजाचं श्रमगीत  'भलरी...' हे  संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. 'घे गड्या घे ....भलरी घे ...भलरी घे ...भलरी घे...' असा या गाण्याचा मुखडा आहे. हे प्रसंगनुरूप गाणं गीतकार व मराठी व्याकरणाचे भीष्म पितामह म्हणून 

ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे असे बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून, संगीतकार हर्षित-अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चांदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावलेत .  देशातील तमाम शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 'रौंदळ'मधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील हे लोकगीत चित्रपटात पहायला मिळणार आहे. या गाण्याबाबत संगीतकार हर्षित-अभिराज म्हणाले की, दिग्दर्शक गजानन पडोळ यांनी जेव्हा या चित्रपटाच्या कथानकात कथेतील प्रसंगांशी एकरूप होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकगीताचा समावेश करण्याबाबत चर्चा केली तेव्हा 'भलरी...' या गाण्याची संकल्पना सुचली. गीतकार बाळासाहेब शिंदे यांनी कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीत लिहिलं, हे गाणं जरी ग्रामीण शैलीतील असलं तरी शहरी-निमशहरी प्रेक्षकांनाही भुरळ पाडणार यात शंका नाही . यातील संगीतरचना सर्व वयोगटातील रसिकांच्या मनाला भिडणारी असल्याचंही हर्षित-अभिराज म्हणाले.

भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथीला आहे. याखेरीज संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सुधाकर शर्मा, डॅा. विनायक पवार यांनीही गीतलेखन केलं असून,  सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार यांनी गायली आहेत. या गाण्यांवर नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली असून, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिलं आहे. अनिकेत खंडागळे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी आणि फैझल महाडीक यांचं संकलन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे. 'ख्वाडा'साठी राष्ट्रीय पारितोषिकावर नाव कोरणाऱ्या साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरनं याचं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे. मेकअप समीर कदम यांनी केला आहे, सिद्धी योगेश गोहिल यांनी कॅास्च्युम्स डिझाईन केले आहेत. सुप्रसिद्ध फाईट मास्टर मोझेस फर्नांडीस यांनी फाईट सीन्स डिझाईन केले असून, गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. वॅाट स्टुडिओमध्ये डीआयचं काम करण्यात आलं असून, श्रीनिवास राव या सिनेमाचे डीआय कलरीस्ट आहेत. सतिश येले यांनी व्हिएफएक्स सुपरवायजिंग केलं आहे, तर आॅनलाईन एडीटींग माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी केले आहे. विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक, तर मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.