'घर बंदूक बिरयानी'मधील 'गुन गुन' गाणं आता तेलुगू, तामिळमध्ये प्रदर्शित
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील 'गुन गुन' या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने अल्पावधीतच संगीतप्रेमींना आपलंस केलं. सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक तरूण तरूणी आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करत आहेत. मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता हे प्रेमगीत तेलुगू आणि तामिळ भाषेतही आपल्या भेटीला आलं आहे. तेलुगूमधील 'गुन गुन' या गाण्याला चंद्रबोस यांचे बोल लाभले असून तामिळमधील गाण्याला युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे. या दोन्ही भाषेतील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून प्रेमाची तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. पहिल्या प्रेमाची चाहूल लागणारं हे सुंदर गीत आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, '' हे गाणं मराठीत ऐकायला जितकं श्रवणीय वाटतं तितकंच तेलुगू आणि तामिळ भाषेतही वाटतंय. एकच गाणं विविध भाषेत करताना मजा आली. मुळात गाण्याची चाल सारखीच आहे. भावनाही तीच आहे. फक्त त्याची भाषा बदलली आहे. मला खात्री आहे, मराठीसह दाक्षिणात्य संगीतरसिकही या गाण्यावर मनापासून प्रेम करतील.''
मराठीत हे गाणं आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलं असून वैभव देशमुख यांचे या गाण्याला बोल लाभले आहेत तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. येत्या ७ एप्रिल रोजी 'घर बंदूक बिरयानी' मराठी, हिंदी तेलुगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment