शुक्रवारी प्रदर्शित होणार 'टर्री' ..
तरुणाईचा जोश जितका कृतीशील तितकाच तो विध्वंसक असू शकतो. आपल्या उमेदीच्या काळात भविष्यकाळ सोबतीला घेऊन आपल्या कौशल्यांना पैलू पाडण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करणारया तरुणाईचे चित्र आपण सर्वत्र पाहतोय. काहीसं बेदरकार आयुष्य जगत, आपल्या स्टाईलचा ‘टेरर स्वॅग’ घेऊन अभिनेता ललित प्रभाकर ‘टर्री' च्या भूमिकेतून आपल्यासमोर यायला सज्ज झाला आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
‘खेळ कोणता पण असो, सुरु करणारा तोच आणि खल्लास करणारा बी तोच’ अशा जिगरबाज अंदाजातील ‘टर्री' आपल्या मैत्रीसाठी आणि प्रेमासाठी कशाप्रकारे उभा ठाकतो, हे ‘टर्री' चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. एका वेगळ्या अंदाजात ललित प्रभाकरने साकारलेल्या संग्रामच्या ‘टर्री’गिरीला तितकीच दमदार साथ देत, नात्यासाठी खमकेपणाने उभी राहणारी सोनल म्हणजेच अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या प्रेमाचा अनोखा रंग हा चित्रपट दाखवून देतो. 'टर्री’ हा शब्द पाळणारा, मैत्री जपणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा आहे. गरम डोक्याच्या 'टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. हा हळवेपणा अधोरेखित करताना संग्राम आपल्या आयुष्याकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतो हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
खटकेबाज संवाद, जबरदस्त अॅक्शन याचा मसाला असलेल्या 'टर्री' चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर,योगेश डिंबळे, स्नेहा जोशी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे, पवन थेऊरकर यांचे आहे. गुरु ठाकुर, क्षितिज पटवर्धन यांनी चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले आहेत. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते, मनीष राजगिरे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत. मंगेश जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत. वेशभूषा अम्रिता चव्हाण तर रंगभूषा सुजित सुरवसे, निखिल नाईक यांची आहे. कलादिग्दर्शन नानाभाऊ मोरे यांचे तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिचं आहे.
Comments
Post a Comment