मराठी भाषा गौरव दिन २७फेब्रुवारी 'जागर मराठीचा' इज्रायलमध्ये.
२७ फेब्रुवारी हा दिवस साहित्याचा मानदंड कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस अखंड महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तसाच तो आता सातासमुद्रपलीकडेही जाऊन विदेशात सुद्धा मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
२०२३ हे साल आणि इस्रायल हे सुद्धा याला अपवाद नव्हते. महाराष्ट्रातील बेने इस्रायल मध्ये स्थायीक समुदाय ज्यांनी अजूनही मराठीची कास सोडलेली नाही त्यांनी भारताच्या इस्रायलमधील दूतावासाच्या भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने अशदोद या शहरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.
याप्रसंगी भारतीय संस्कृतीक केंद्रातर्फे मराठीचा प्रसार आणि प्रचार तसेच भारतीय वंशाच्या नवीन पिढीला मराठीची ओळख करून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या श्रीमती इवा तळेगावकर आणि त्यांचे सहकारी यांनी अशदोद येथील एडमन साफरा कम्युनिटी सेंटर येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी प्रमुख पुढाकार घेतला.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री नोवा मस्सिल जे मायबोली या मासिकाचे गेले ३७ वर्ष संपादक आहेत, हे मराठीचे एकमेव इस्रायल मधून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक आहे म्हणून उपस्थित होते.
तसेच अशदोद शहराचे उपमहापौर श्री एली नाक्ट हे ही देखील उपस्थित होते. भारतीय संस्कृती केंद्रातर्फे प्रमुख श्री विनोद पवार, श्री विनोद कोळे, योगा गुरु दर्शना राजपुरोहित तसेच भारतीय दूतावासातर्फे सेरा पेणकर यांनी उपस्थिती लावली.
तर या उल्लेखनीय अशा कार्यक्रमात डॉक्टर धनश्री मुंढे या तेल अविव विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या आहेत, त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'कणा' आणि '' या दोन कवितांचे सुंदर असे वाचन केले.
श्री विनोद पवार यांनी सुद्धा प्रास्ताविक केले जे अप्रतिम सुंदर होते. कार्यक्रम अतिशय वैविध्यपूर्ण असा नवरसांनी नटलेला होता भारतीय वंशाच्या सोफिया आणि श्मुएल या कलाकारांनी विविध मराठी गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. ओवी, भारुड, लावणी, कोळीगीते, बडबड गीते असे विविध प्रकार साजरे केले गेले.
इवा तळेगावकर यांच्या विद्यार्थी गटाने मराठीत प्रार्थना म्हणून सर्वांकडून कौतुकाची पावती मिळवली.
तर असा हा नावीण्यपूर्ण नवरसांनी नटलेला मराठी गौरव दिन इस्राएल मध्ये अति उत्साहात साजरा झाला व त्याला फक्त मराठी भाषिकच नव्हे तर इतर भाषिक प्रेक्षकांचा सुद्धा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचा शेवट यांच्या पसायदानानी झाला. तसेच भारतीय खाऊ समोसा आणि बटाटा वडा खाऊन आनंदाने साजरा झाला.
Comments
Post a Comment