"बटरफ्लाय" च्या निमित्ताने मीरा वेलणकर यांचे सिनेदिग्दर्शनात पदार्पण....
जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा विविध क्षेत्रात काम केल्यानंतर मीरा वेलणकर आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत. त्यांच्या बटरफ्लाय या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अत्यंत फ्रेश आणि कलरफुल अशा या चित्रपटाविषयी या टीजरमुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मीरा वेलणकर यांनी आतापर्यंत अनेक नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जाहिरातींनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. त्याशिवाय त्यांनी मराठी रंगभूमीवर नटसम्राट, तू तर चाफेकळी, लव्हस्टोरी, आय अॅम नॉट बाजीराव अशा नाटकांमध्ये अभिनय केला आहे. पिंपळपान, बंधन, पंखांची सावली या टीव्ही मालिका, प्रेमाची गोष्ट या चित्रपटात अभिनय केला आहे. तर लव्हस्टोरी, मिस्टर अँड मिसेस, फिर से हनिमून या नाटकांसाठी वेशभूषेची जबाबदारी निभावली आहे. वेगवेगळ्या माध्यमात चतुरस्र काम केल्यानंतर आता 'बटरफ्लाय' या चित्रपटाचं त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे.
अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम आणि अभिजित साटम यांच्या अप्रोग्रॅम स्टुडिओजनं 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. विभावरी देशपांडे ह्यांची कथा असून कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी चित्रपटाची संवाद लिहिले आहेत. प्रत्येकाच्या मनातल्या फुलपाखराची गोष्ट या चित्रपटातून उलगडण्यात आली आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Post a Comment