दिव्याला मिळाली 'विठूराया'ची साथ.



अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या 'विठ्ठल माझा सोबती' असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर  नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'विठ्ठल माझा सोबती'  या चित्रपटात विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.  फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून संदीप मनोहर नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाच्या निमित्ताने वारी न अनुभवता येणाऱ्या रसिकांना या चित्रपटाच्या रूपाने वारीचा सोहळा आणि लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. 'आषाढी एकादशी'चं औचित्य साधून २३ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल.  

दिव्या सांगते, ‘विठ्ठलाला मानणारी ही व्यक्तिरेखा असून ‘विठ्ठल’ तिचा 'सोबती'  बनून तिला कशाप्रकारे मदत करतो, हे दाखवतानाच भक्तीचा मार्ग तुम्हाला संकटातून तारून नेत असतो हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे.  
     कुटुंबकलहाला कंटाळलेल्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण 'विठ्ठल' नामक मदतनीस येतो. 'विठ्ठल'च्या येण्याने नेमकी काय जादू घडते? त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का? हा 'विठ्ठल' नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला?  याची हृदयस्पर्शी कथा 'विठ्ठल माझा सोबती' चित्रपटातून पहाता  येणार आहे.  
     पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे. शिवाय नाईंटी नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे आणि बॉम्बे बरोडा वेब टॉकीज हे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...