"जागतिक युद्ध निरर्थक"! 'प्रतिबिंब नाट्य उत्सवा'मध्ये मकरंद देशपांडे यांनी मांडले परखड मत.
प्लॅनेट मराठीने दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)सोबत असोसिएट होऊन 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' राबवला होता. यावेळी 'प्रतिबिंब'च्या माध्यमातून अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये या नामवंतानी ‘एनसीपीए’शी जोडल्या गेलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, काही गंमतीदार किस्से, आपापली मतं, खळबळजनक खुलासे केले. आता 'प्रतिबिंब'चा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात थिएटर, हिंदी, मराठी चित्रपट अशा विविध माध्यमांवर आपला एक वेगळा ठसा उमटवणारे नामवंत अभिनेते मकरंद देशपांडे सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांनी 'सैनिक' या त्यांच्या एक तासाच्या मोनोलॉगविषयी तसेच अनेक वादग्रस्त विषयांवर भाष्य केलंय. हा भाग प्रेक्षकांना बुधवारपासून म्हणजेच २१ जूनपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर पाहता येणार आहे.
'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' मध्ये मकरंद देशपांडे लिखित, दिग्दर्शित,अभिनित 'सैनिक' या जागतिक युद्धावर बेतलेल्या एकांकिकेचा प्रिमिअरही आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने निवेदक श्रवण यांनी मकरंद देशपांडे यांच्याशी बातचीत केली. 'सैनिक'मध्ये मकरंद देशपांडे यांनी एका वॉर फोटोग्राफरची भूमिका साकारली असून मकरंद देशपांडे यांचा सैनिकांबद्दलचा आदर, आत्मीयता मुलाखतीच्या माध्यमातून समोर आली आहे. सैनिकांचे आयुष्य कसं असते, यावर त्यांनी 'सैनिक'च्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. यादरम्यानचे अनेक रंजक किस्से आणि अनुभव त्यांनी या मुलाखतीतून सांगितले आहेत. तसेच युद्धाचा परिणाम आर्थिक प्रगतीवर होतो, हे म्हणणं खोडून युद्ध हे निरर्थक असल्याचे परखड मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलेसध्याच्या युक्रेन रशियामध्ये सुरु असणाऱ्या युद्धाबद्दलही खळबळजनक वक्तव्य केले आहे. याव्यतिरिक्त थिएटरपासून सुरु झालेला त्यांचा आतापर्यंत प्रवास आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून कळणार आहे.
या उत्सवाबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आम्हाला आनंद आहे की, कलेला प्रोत्साहन देणाऱ्या मुंबईतील एनसीपीए सारख्या संस्थेशी आम्ही जोडले आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारचा शो केला आणि या शोला भरभरून प्रतिसाद मिळाला. आता 'प्रतिबिंब'ची शेवटची मुलाखत प्रदर्शित होत आहे. ही अशा व्यक्तीची मुलाखत आहे, ज्याने थिएटरवर अधिराज्य गाजवलं आहे. मनाला सलणाऱ्या अनेक गोष्टी, मतं, खंत, अनुभव, आठवणी त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केल्या आहेत.''
Comments
Post a Comment