'माझी माती - माझा देश' अभियानांतर्गत कणकवलीतील माती नेचर रिसाॅर्टमध्ये साकार झाले जिल्ह्यातील पहिले'अनाम वीर स्फूर्तीस्थळ'.
कणकवली, १५ ऑगस्ट, २०२३: "अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त;
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात" या कुसुमाग्रजांच्या कवितेतील अनाम वीरांचे देशासाठीचे बलिदान आता देशवासियांच्या विस्मरणात न जाता त्यांचे सदैव स्मरण, यथोचित सन्मान व त्यांच्यापासूनची प्रेरणा घेण्यासाठी आता अशा अनेक ज्ञात - अज्ञात वीर जवानांचे, शहीदांचे स्मरण पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात 'मेरी माटी, मेरा देश' (माझी माती - माझा देश) या अभियानांतर्गत केलेल्या 'पंचप्रण' शपथेतून सदैव केले जाणार आहे.
या ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अभियानाला व पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवली येथील अल्पावधीतच राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेकडो पर्यटकांचे आकर्षण बनलेला व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नवा मानबिंदू बनत असलेल्या 'माती नेचर रिसाॅर्ट' या निसर्गाशी व अस्सल मातीशी नातं जोडणाऱ्या पर्यटन केंद्रात देशाच्या अशा असंख्य 'अनाम' वीरांना, शहीदांना व देशाचे सीमांवर रक्षण करणाऱ्या जवानांना आज देशाच्या शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनी एक अनोखे स्फूर्तीस्थळ निर्माण करीत मानवंदना देण्यात आली. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच स्फूर्तीस्थळ आहे.
माती नेचर रिसाॅर्टचे संस्थापक श्री. प्रफुल्ल व सौ. साक्षी सावंत यांच्या संकल्पनेतून याच रिसाॅर्टमधील मॅनेजर श्री गुलाब विश्वकर्मा व सिंधुदुर्गातील कलाकार श्री. संदीप गावडे या दोन कलाकारांच्या कलेतून 'अनाम' वीरांच्या एका आगळ्यावेगळ्या प्रतिकृतीची स्थापना व अनावरण या रिसाॅर्टमधील सर्व कर्मचारी, आलेले पर्यटक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्ताने, देशासाठी समर्पण दिलेल्या अशा वीर जवानांचे स्मरण करण्यात आले व त्यांना स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीताने मानवंदना दिली गेली. तसेच, या वीरांचे स्मरण करण्याची व निसर्गातील मातीचेही ऋण मान्य करीत देशाच्या मातीला अधिक समृद्ध करीत, निसर्गाची, जलसाधनांची व पर्यावरणाची जपणूक व संरक्षण करण्याची त्याचप्रमाणे देशाची एकता, अखंडता, राष्ट्राप्रती व लोकांप्रती कर्तव्यपालन, स्वयंपूर्णता व स्थानिक विकासातून देश-विकासात योगदान आदी पाच कर्तव्यांची 'पंचप्रण' शपथ घेण्यात आली.
माती नेचर रिसाॅर्टमधील या प्रेरणादायी स्थानाला 'माती - अनाम वीर स्फूर्तीस्थळ' असे नाव देण्यात आले असून येथील प्रतिकृती श्री गुलाब विश्वकर्मा व श्री संदीप गावडे यांनी पूर्णपणे नैसर्गिक गोष्टींचा व मातीचा वापर करून बनविली आहे. यात वीर जवानाचे शिरस्त्राण, कर्तव्यनिष्ठ होत देशरक्षणार्थ त्याच्या हातात सदोदित असलेली रायफल अशी ही प्रतिकृती आहे. हे स्फूर्तीस्थळ 'माती नेचर रिसाॅर्ट' याठिकाणी कायमस्वरूपी स्थापण्यात आले आहे. भविष्यात येथे येणाऱ्या प्रत्येकाला या स्थळांचे दर्शन घेता येईल व त्यातून वीरांचे, वीरपत्नींचे, वीरमातांचे स्मरण व्हावे तसेच देशाच्या मातीशी एकरूप होत पर्यावरण रक्षणासाठीही प्रेरणा घ्यावी, अशी माहिती सौ. साक्षी सावंत यांनी दिली.
यानिमित्ताने, येथील मातीने भरलेल्या 'अमृत कलशा'मध्ये रोपे लावण्यात आली. हा 'अमृत कलश' नवी दिल्ली येथे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सांगता कार्यक्रमासाठी पाठविण्यात येईल, असे सौ. सावंत यांनी सांगितले.
Comments
Post a Comment