मल्टीस्टारर "इंद्रधनुष्य"च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात...
"मनातल्या उन्हात", "ड्राय डे", "भारत माझा देश आहे" असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता "इंद्रधनुष्य" हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री
प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला.
आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून "इंद्रधनुष्य" चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नितीन वैद्य चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव, पटकथा पांडुरंग जाधव, विपुल देशमुख आणि संवादलेखन विपुल देशमुख यांचेच आहे. नागराज दिवाकर छायांकनाची, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे. लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे. पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यानं "इंद्रधनुष्य" या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टारकास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे.
Comments
Post a Comment