२० व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट' महोत्सवाचा समारोप सोहळा नव्या ऊर्जेने भारलेल्या वातावरणात संपन्न.




गेला आठवडाभर रंगलेल्या २० व्या  थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा सिटीलाईट चित्रपटगृहात नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ४५ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, चैतन्य शांताराम, संतोष पाठारे, संदीप मांजरेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर, ज्ञानेश झोटिंग आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.    

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मा.विकास खारगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नेहमीच विविध चित्रपट महोत्सवांना पाठिंबा दिला आहे.  महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यासोबतच आर्थिक मदतीसाठी शासन पुढाकार घेत असते. असे वेगवेगळे महोत्सव प्राधान्याने आयोजित करत, त्यावर चर्चा घडविणे गरजेचे आहे. त्यातून चित्रपटसृष्टीसाठी असलेली आव्हाने कळतात तसेच नव्या गोष्टी, तंत्रज्ञान यांचे आदानप्रदान अशा महोत्सवांतून होते, जे चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.   

कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीचा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना मा. विकास  खारगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. असे महोत्सव प्रेक्षकांची अभिरुची घडवत असतात. महोत्सवासाठी तरुणाईने  केलेल्या मेहनतीचे कौतुक करताना प्रकाश मकदूम यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त  केली. 
 
यंदाच्या चित्रपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे चित्रपट रसिकांना पहायला मिळाले. फेस्टिव्हल मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल ही यावेळी जाहीर करण्यात आला. मराठी विभागात सर्वोत्कृष्ट  चित्रपटाचा बहुमान ‘स्थळ’ या  चित्रपटाने मिळवला तर याच चित्रपटासाठी नंदिनी चिकटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. संतोष कोल्हे यांना ‘स ला ते स ला ना ते’ या  चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता  कैलास वाघमारे यांनी ‘गाभ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. ‘स्क्वॉड ऑफ गर्ल्स’ या इराणी चित्रपटाला  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन चित्रपट विभागात ‘फॅमिली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळवला तर ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटासाठी आशिष भेंडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘या गोष्टीला नावचं नाही’ या चित्रपटासाठी जयदीप कोडोलीकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ममता शंकर (बिजया पोरे) आणि अनुषा कृष्णा (हाऊस ऑफ कार्डस) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...