जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार 'बहिर्जी'.
सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय... बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय... अशी टॅगलाईन असणाऱ्या 'बहिर्जी' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसलेही नाही. त्यांचीच यशोगाथा ''बहिर्जी' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. 'बहिर्जी'च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येईल, याविषयी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीचे कुतूहल आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, '' छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमानगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजनाच इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हते. मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायला सुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केले तर त्यातूनच बहिर्जी नावाची वीण हळुवार उलगडत जाते. हेच दाखवण्याचा प्रयत्न 'बहिर्जी' या चित्रपटातून आम्ही केला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊनच या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पुष्प भेटीला आले असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट करू.''
Comments
Post a Comment