जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची मोठी घोषणा! रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट "राजा शिवाजी"




      छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा करत भारताच्या असामान्य योद्ध्याचा असाधारण असा जीवन प्रवास पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रकारे सादर केला जाणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्हीं भाषेमध्ये असणार आहे. या ऐतिहासिक कथेमधे बलाढ्य शक्तींविरुद्ध बंड करत स्वराज्य स्थापन करणारा असा असाधारण वीर योद्धा ते आदरणीय ‘राजा शिवाजी‘ यांचा अचंबित करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे. 

या चित्रपटाच्यापाठी एक भक्कम टीम असणार असून त्यातील महत्वाचं नावं म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल हे या चित्रपटाची हिंदी आणि मराठी गाणी करणार आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन ह्या चित्रपटानिमीत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसंच या भव्यदिव्य चित्रपटाच्या मागे जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आणि मुंबई फिल्म कंपनीच्या जेनेलिया देशमुख असणार असून त्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
     या प्रकल्पाबद्दल ज्योती देशपांडे, प्रेसिडेंट - मीडिया आणि एंटरटेनमेंट, RIL म्हणाल्या, की “जिओ स्टुडिओज् मध्ये, आम्ही कथाकथनाच्या सीमा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण कथा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. ‘राजा शिवाजी‘ या चित्रपटाद्वारे आमच्या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थी मूर्त रूप लाभत आहे. ही केवळ प्रादेशिक कथा नसून ती भाषा आणि प्रदेशांच्या पलीकडे जाणारी, भारताच्या मातीतील एका महान सुपुत्राची शौर्यगाथा आहे. आणि ती सादर करण्यासाठी या भव्य प्रकल्पात रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्याशी जोडल्याचा आम्हाला अभिमान आहे.‘
     रितेश देशमुख, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणाला, " इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….”राजा शिवाजी’ "
       जेनेलिया देशमुख, निर्माती, मुंबई फिल्म कंपनी, “गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो. हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.
      ‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती. ही शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.”.
        राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल म्हणाले, " जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा असेल जो शेकडो वर्षांनंतर आजही आमच्या, हृदयात, श्वासात, रक्तात, धमन्यांत आणि मनामनांत जिवंत आहे. त्यांच्या अद्वितीय आयुष्याची गाथा, त्यांच्या पराक्रमाचा थरार या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचणार आहे. आमच्या या राजासाठी आजच्या काळात आपण काहीं करू शकतो ही कोणत्याही कलाकारासाठी अत्यंत अभिमानाची भावना असते, तशी सुवर्ण संधी "राजा शिवाजी" या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळते आहे, यासाठी आम्हीं स्वतःला खूप भाग्यशाली समजतो.     
".          प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन म्हणाले, "शिवाजी हा केवळ एक चित्रपट नाही; तो उत्कटतेचा, समर्पणाचा आणि रितेश देशमुखच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचा आणि पटकथेचा परिश्रम आहे. याचे छायाचित्रण करण्यासाठी खूप वर्षांपासून आमंत्रित केले गेले होते आणि आज त्याचे वास्तवात रूपांतर होते आहे. आणि हा केवळ रितेश यांच्या चिकाटीचा आणि passion चा पुरावा आहे.
           "‘राजा शिवाजी‘ हा एक ऐतिहासिक आणि अद्भुत अनुभव देणारा ॲक्शन ड्रामा असणार आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून, ही ऐतिहासिक गाथा पडद्यावर दर्शवण्यासाठी सर्व टिम आता सज्ज झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.