“स्वरगंधर्व सुधीर फडके” चित्रपटाने पूर्ण केले ५० दिवस.


योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मराठीतील सर्वात मोठा म्युझिकल बायोपिक ठरलेला चित्रपट महाराष्ट्रदिनी प्रदर्शित झाला! जगभरातील प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादात चित्रपटाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केले आहेत आणि शंभरीकडे वाटचाल करेल असा विश्वास निर्माते सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी व्यक्त केला आहे!
लेखक दिग्दर्शक म्हणून योगेश देशपांडे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. बाबूजी सुधीर फडके यांचे आयुष्य पडद्यावर आणण्यापूर्वी तब्बल ४ वर्ष या विषयाचा अभ्यास करून, बाबूजींचे आयुष्य बारकाईने निवडण्याचं शिवधनुष्य पेलण्यात योगेश यशस्वी झाले आहेत.
मूळ संगीत आणि मूळ दिग्गज गायकांचा आवाज असलेली गाणी वापरण्याची कल्पना चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच साधण्यात दिग्दर्शक कमालीचे यशस्वी झाले आहेत. जगभरातील प्रेक्षक चित्रपट पाहून भारावून जातात, गाणी ऐकून प्रचंड आनंदी होतात आणि बाबूजींचा संघर्ष पाहून नकळतपणे डोळे पाणवतात, या वा अशा असंख्य प्रतिक्रिया चित्रपटाला लाभल्या आहेत. 
आजवर अनेक मराठी दिग्दर्शकांनी बायोपिक चित्रपट केलेले आपल्याला माहित आहेत, त्या रांगेत आता योगेश देशपांडे या अभ्यासू आणि कल्पक दिग्दर्शकाची नोंद झाली आहे. 
या चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन जगभरातून वाहवा मिळवत असताना, त्यांच्या रिडिफाईन प्रॉडक्शन्सची पुढची निर्मिती देखील लवकरच घोषित होण्याचे संकेत दिग्दर्शकाशी बोलताना मिळत होते.
आता प्रेक्षकांची आपल्याकडून अपेक्षा उंचावली आहे आणि पुढील चित्रपट, विषय, आशय आणि त्याची उत्तम निर्मितीमुल्य ही जबाबदारी वाढली असल्याचे योगेश ने सांगितले.

मराठी संगीतविश्वातील मोठं नाव, राष्ट्रसेवा, सावरकर भक्ती जपत ध्यासयुक्त जगलेलं आयुष्य, ग. दि. माडगूळकरांसह निर्मिलेलं गीतरामायणा सारखी प्रतिभासंपन्न अजरामर कलाकृती ज्यांनी घडवली, अशा बाबूजींच्या आयुष्याला चित्रपट माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचे काम केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. काही रसिकांनी पत्र पाठवून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवक, रसिकप्रेक्षक यांनी आपल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर नोंदविल्या आहेत. 
या इतक्या अशा प्रतिक्रिया माझ्यासाठी आणि आमच्या तमाम टीमसाठी मोलाच्या आहेत आणि प्रचंड समाधान देणाऱ्या आहेत असे दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी सांगितले.

आज सुवर्णदिवस साजरा करताना पुण्यातील ५० विशेष प्रेक्षकांनी, जे बाबूजींचे प्रत्यक्ष सहयोगी आणि स्वयंसेवक म्हणून संपर्कात होते, अश्या चिरतरुण प्रेक्षकांनी हा ५० वा दिवस साजरा केल्याचा अनोखा उपक्रम देखील या चित्रपटाचे महत्त्व विषद करून जातो.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.