"नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा मनोरंजक प्रवास २० सप्टेंबरपासून.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा 2" हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नुकतेच मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते.. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.
चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा 2"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.
"नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा 2" मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पहायला लागणार आहे.
Comments
Post a Comment